- पुरुषोत्तम भागडकर
देसाईगंज (जि. गडचिरोली): तालुक्यातील फरी जंगल परिसरात एका बैलाची शिकार झाल्याची घटना १७ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. मात्र, नेमकी शिकार वाघाने केली की बिबट्याने, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
फरी गावचे शेतकरी गुरे चारण्यासाठी गावालगत जंगलात जातात. १६ रोजी पांडुरंग आसाराम शेंडे यांच्या मालकीचे बैल घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या मदतीने शोधाशोध केली. मात्र, त्यादिवशी त्यांना बैलाचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी फरी कक्ष क्र. ९३ फरी ते उसेगाव या दरम्यान चराई करण्यास जनावरे नेली होती. तेथे पांडुरंग शेंडे यांच्या बैलाची शिकार झाल्याचे आढळून आले.वनक्षेत्र सहायक के. वाय. कऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. मात्र, शिकार कोणी केली याचा नेमका निष्कर्ष काढण्यात अद्याप यश आलेले नाही.
शिकारी ओळखण्यासाठी लावला कॅमेरा
बैलाची शिकार नेमकी कोणी केली, हे पडताळण्यासाठी घटनास्थळी वन विभागाने कॅमेरा लावला आहे. शिकार करणारा प्राणी बैलाच्या मांसासाठी तेथे पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही शक्कल लढविली आहे.