रेल्वे विभागाची कारवाई : भूमिगत पुलाच्या अॅप्रोच रस्त्यालगतचे अतिक्रमण काढताना अतिरिक्त कुमक बोलाविली देसाईगंज : रेल्वे स्थानकावरील भूमिगत पुलाच्या अॅप्रोच रस्त्याला लागून असलेले अतिक्रमण काढावे, अशा सूचना रेल्वे विभागाने अतिक्रमणधारकांना देऊनही अतिक्रमण काढले नव्हते. अखेरीस रेल्वे विभागाने कारवाई करीत ४ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून बुलडोजरच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. रेल्वे क्रॉसिंगमुळे देसाईगंज शहराचे दोन विभागात विभाजन झाले आहे. एका भागात रहिवासी आहेत तर दुसऱ्या भागात बाजारपेठ आहे. परिणामी नागरिकांना बाजारपेठेत जावेच लागते. शहराच्या मधोमध दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची लाईन गेली आहे. या मार्गावरून दिवसातून १० ते १२ प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेगाड्या धावतात. तेवढ्या वेळा या ठिकाणची रेल्वे फाटक बंद केली जाते. परिणामी नागरिकांना रेल्वे फाटकावरच ताटकळत बसावे लागते. ही बाब शहरवासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. भूमिगत रेल्वे पुलाच्या अॅप्रोच रस्त्याला लागून अतिक्रमण वाढले आहे. सदर अतिक्रमण काढण्यात यावे, याबाबतची नोटीस दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागभिड येथील सेक्शन इंजिनिअर यांनी २७ एप्रिल रोजी १९ अतिक्रमणधारकांना बजाविली होती. सदर अतिक्रमण सात दिवसाच्या आत काढावे, असे नोटीसमध्ये बजाविण्यात आले होते. मात्र अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने कारवाईचा बडगा उगारला. अतिक्रमण हटविताना रेल्वे पोलीस बलाला पाचारण करण्यात आले होते. सहायक विभागीय अभियंता ए. के. पांडेय यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. रेल्वे अभियंता विभागाचे १५ अधिकारी, कर्मचारी, रेल्वे विद्युत विभागाचे दोन कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाचे २५ अधिकारी, देसाईगंज पोलीस स्टेशन, नगर पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. बुलडोजर लावून अतिक्रमण हटविण्यात आले. सदर अतिक्रमण हटविण्याची कारवाई रेल्वे पोलीस ठाणे प्रभारी आर. वाय. ठाकूर, रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी जी. एफ. ठारफल, बांधकाम अभियंता बी. साहू यांच्या नेतृत्वात करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज शहरातील अतिक्रमणावर चालला बुलडोजर
By admin | Published: May 05, 2017 1:09 AM