लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : स्थानिक नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने २५ मे राेजी बुधवारला शहरातील मुख्य महामार्गावर रस्त्यालगतचे कच्चे व पक्के अतिक्रमण बुलडोझरच्या सहायाने हटविण्यात आले. या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील अतिक्रमणधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. ही मोहीम गुरुवारला देखील चालूच राहणार असल्याने अनेकांनी आपले अतिक्रमण स्वतः काढण्यास सुरुवात केली आहे.नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व पोलीस विभाग या पाच विभागांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य बाजारपेठेतील थोरात चौक ते फवारा चौक ते भारतीय स्टेट बँक ते दुर्गामाता मंदिर ते जुनी महात्मा गांधी शाळा ते आयडीबीआय ते फवारा चौक या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले.सदर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा, कार्यालय अधीक्षक महेश गेडाम, नगरविकास विभागप्रमुख दानिशोद्दीन काझी, बांधकाम अभियंता साई कोंडलेकर, नायब तहसीलदार बेहरे, पोलीस निरीक्षक महेश मसराम, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, सुजाता भोपळे, सोनम नाईक आदी उपस्थित होते.अतिक्रमणधारकांनी माेकळ्या जागेत पुन्हा ‘जैसे थे’ बांधकाम केल्यास त्या बांधकामांची मोजणी करून मंजूर नकाशानुसार बांधकाम ठेवून अतिरिक्त बांधकाम पाडण्यात येईल, असे मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांनी सांगितले. या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले.
राष्ट्रीय महामार्गावर कारवाई होणार- साकोली-वडसा -आरमोरी ३५३ ही या राष्ट्रीय महामार्गालगत देसाईगंज शहरातील मुख्य रस्त्यावरील अस्थायी पट्टेधारकांसह लहान-मोठे अतिक्रमणधारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत सूचनेतील राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण ( भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ मधील नियम २६ ची उपकलम (२) च्या अधीन राहून उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी २० मे राेजी नोटीस बजावली. त्यानंतर अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत. तथापि राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी मंगळवारपासून डेरेदाखल झाले असल्याने राष्ट्रीय महामार्गावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.