लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीने वैलोचना नदीवर सिमेंट बॅगचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.वैरागड गावाला वैलोचना नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वैलोचना नदीवर पाणीपुरवठा योजना बांधण्यात आली आहे. या पाणीपुरवठा योजनेजवळच शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा अपूर्ण असल्याने या बंधाऱ्यात पाणी राहत नाही. परिणामी मार्च, एप्रिलनंतर पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होऊन पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी पाऊस कमी झाला असल्याने पाणीटंचाईचे संकट फेब्रुवारी महिन्यातच ओढवणार आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने जुन्या शिवकालीन बंधाऱ्याला जोडून सिमेंटच्या बॅगचा बंधारा बांधला आहे. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडून काही दूर अंतरापर्यंत पाणी साचले आहे. यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीपर्यंत पाणी राहणार आहे.वैरागड परिसरातील शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. धानपिकासाठी नदीचे पाणी वापरले जाते. परिणामी नदीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी कमी पडते. परिणामी वैरागडला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पिण्यासाठी पाण्याचा वापर करणे याला प्राधान्य देत शेतकऱ्यांनी नदीचे पाणी धानपिकासाठी वापरू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.पाणीटंचाई निवारण्यासाठी वैरागड ग्रामपंचायतीने योजलेल्या उपायाची प्रशंसा केली जात आहे. इरतही गावांनी याचे अनुकरण करावे.नवीन पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यातवैरागड हे आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. वैरागडला ऐतिहासिक दर्जा आहे. दिवसेंदिवस वैरागड गावाचा विस्तार व लोकसंख्या वाढत चालली आहे. जुनी पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासूनची आहे. या योजनेचे पाणी पुरत नसल्याने नवीन पाणीपुरवठा योजना वैलोचना नदीवरच गोरजाई डोहाच्या खालील बाजूस मंजूर करण्यात आली आहे. मात्र या योजनेचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे वैरागडवासीयांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषद सदस्यांनी सदर योजनेसाठी पाठपुरावा करून नवीन योजना बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे. नवीन योजना झाल्यास पाणीटंचाई कमी होईल.
बंधाऱ्याने जलसंकटावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:59 PM
उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीने वैलोचना नदीवर सिमेंट बॅगचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
ठळक मुद्देवैरागड ग्रामपंचायतीचा उपक्रम : वैलोचना नदीपात्रात साचले पाणी