वैरागड येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून, या ठिकाणी एक कनिष्ठ अभियंता आणि आठ-दहा वर्षांपूर्वी २३ कर्मचारी कार्यरत होते; पण मागील १० वर्षांत या कार्यालयात कार्यरत काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर काहींची या ठिकाणाहून बदली झाली. त्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. वर्षभरापूर्वी येथील कार्यालयात कनिष्ठ अभियंता भवरे यांची बदली झाली तेव्हापासून वैरागड मंडळ कार्यालयाचा भार आरमोरी येथील अभियंत्याकडे दिला आहे; पण दुसरे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असल्याने ते वैरागड कार्यालयात फार अल्पवेळ हजर राहत असल्यामुळे विद्युत ग्राहकांची कामे रेंगाळली आहेत.
या वीज मंडळ मंडळाच्या कार्यक्षेत्रात वैरागड, मोहझरी, सुकाळा, नागरवाही, शिवनी, मानापूर, देलनवाडी, मांगदा, कोसरी, कुलीकुली, पिसेवडधा, कुरडी, डोंगरतमासी, वडेगाव, मेंढा व भाकरोंडी परिसरातील अनेक गावांचा समावेश असून, प्रत्येक गावातील वीज ग्राहकांची मोठी संख्या, कृषी पंपधारक शेतकरी आणि वारंवार विजेचा लपंडाव, कमी विद्युत दाब यामुळे नागरिकांच्या बऱ्याच समस्या असतात. गावाप्रमाणे नेमून दिलेले वीज कर्मचारी हे ग्राहकांच्या तक्रारीनुसार तांत्रिक अडचणी पूर्ण करतात; पण वीज ग्राहक, कृषीपंपधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी सोडविण्यासाठी आरमोरी कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. वैरागड कार्यालयात कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नसल्याने ग्राहकांना आल्यापावली गावी परतावे लागत आहे.
वैरागड कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वीज ग्राहकांचे आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, होणारी अडचण टाळण्यासाठी वैरागड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिक कर्मचारी आणि वर्षभरापासून रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.