आमगाव म. / मुलचेरा : राज्य परिवहन महामंडळाची एमएच ०७ सी ८९५९ ही गडचिरोली-खोर्दो-हिवरगाव-रेखेगाव मार्गे घोटकडे जाणारी बस मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास रेखेगाव बसथांब्याजवळ बंद पडली. तसेच अहेरी आगाराची अहेरी-लगाम-मुलचेरा बसमध्ये मलेरा गावाजवळ बिघाड निर्माण झाला. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारामार्फत दुर्गम भागात अनेक भंगार बसेस वाहतुकीवर चालविल्या जात आहे. त्यामुळेच प्रवासात मध्येच बस कुठेही बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. गडचिरोली-खोर्दो-रेखेगाव-घोट मार्गे जाणारी बस ९ वाजता बंद पडली. चालक व वाहकाने याची माहिती अहेरी आगाराला दिली. मात्र आगारातून मेकॅनिक लवकर घटनास्थळी पोहोचले नाही. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत सदर बस बिघडलेल्या स्थितीत रस्त्यावर उभी होती. मलेरा गावाजवळ अहेरी-लगाम-मुलचेरा बसमध्ये बिघाड निर्माण झाल्याने सदर बस दुरूस्त करण्यास प्रचंड वेळ लागला. परिणामी या बसमधील प्रवासी व शाळकरी विद्यार्थ्यांना खासगी वाहनाद्वारे इच्छितस्थळी पोहोचावे लागले. आगाराला माहिती देऊनही मेकॅनिक तत्काळ पाठविण्यात येत नसल्याने आम्हाला तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, असे खोर्दो-घोट मार्गे जाणाऱ्या बसमधील चालक, वाहकाने सांगितले. सुरळीत बसेस देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)
बसमध्ये बिघाड; प्रवाशांना त्रास
By admin | Published: July 20, 2016 1:12 AM