भोंगळ कारभार : बल्लारपूर स्थानकावर प्रवासी दोन तास ताटकळतप्रशांत ठेपाले आलापल्ली‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रिदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ढिसाळ कामगिरीमुळे चंद्रपूर-अहेरी या बसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना बल्लारपूर बसस्थानकावर सुमारे दोन तास भर उन्हात ताटकळत राहावे लागल्याचा प्रकार शनिवारी घडला. एसटी वाहकाकडील तिकीट मशीन बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.चंद्रपूर आगाराची एमएच ४० एन ९९९३ क्रमाकांची चंद्रपूर-अहेरी ही बस शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूर आगारातून प्रवाशी घेऊन निघाली. सदर बस बंगाली कॅम्पपर्यंत पोहोचताच बस वाहकाकडील तिकीट मशीन काम करीत नव्हती. मात्र मशीन तत्काळ बदलविण्याऐवजी बस पुढे नेण्यात आली. बल्लारपूर येथे बस पोहोचताच तिकीट मशीन पूर्णत: बंद पडली. बल्लारपूर बसस्थानकाचे काम सुरू असल्याने तिकीट मशीन चार्जींगला लावणे शक्य झाले नाही. दरम्यान बसचालक व वाहकांनी प्रवाशांना पैसे परत देऊ केले. तसेच दुसऱ्या बसमध्ये बसवून देतो, असेही सांगितले. परंतु मागून येणाऱ्या बसेस प्रवाशांनी आधीच भरगच्च भरून असल्याने नवीन प्रवासी त्या बसमध्ये चढविणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी दुसऱ्या बसमध्ये जाण्यास नकार दिला. बस वाहकाकडे दुसरे पर्यायी साधन म्हणजे, प्रिंट तिकीट तथा पंचींग मशीन होती. परंतु बसचे तिकीटदर नसल्याने वाहकाने दुसरे तिकीट प्रवाशांना देऊन बस पुढे नेण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे चालक-वाहक व प्रवाशात शाब्दीक बाचाबाचीही झाली. आलापल्लीचे शिक्षक सतीश खाटेकर यांनी बसच्या चालक वाहकास अशी विनंती केली की, दुसऱ्या बस वाहकाकडून तुम्ही तिकीट दर पत्रक मागून बस नियोजित स्थळी घेऊन जा. परंतु चालक व वाहक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान प्रवाशांचे दोन तास बल्लारपूर बसस्थानकावर प्रतीक्षा करण्यात गेले. अखेर खाटेकर यांनी तिकीट काढलेल्या प्रवाशांना अहेरीपर्यंत घेऊन गेलेच पाहिजे, अशी अट मांडली. तेव्हा दोन तासानंतर प्रवाशी घेऊन बस सायंकाळी ४.१५ वाजता गोंडपिंपरी बसस्थानकावर पोहोचली. या ठिकाणी मशीनची चार्जींग करून बस पुढील प्रवासासाठी निघाली. तिकीट मशीनची चार्जिंग संपल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांचे पाकिट लंपासप्रवाशी म्हणून बसमध्ये हजर असलेले प्रभाकर भानू शेंडे रा. कान्होली ता. चामोर्शी हे चंद्रपूरवरून गोंडपिपरीला एका लग्न कार्यासाठी जात होते. मात्र त्यांनाही दोन तास तेथे थांबावे लागले. बल्लारपूर बसस्थानकावर अज्ञात चोरट्याने शेंडे यांचे पाकिट लंपास केले. यात चार हजार रूपये होते.
बस वाहकाकडील तिकीट मशीन बंद पडल्याने प्रवाशांना त्रास
By admin | Published: April 16, 2017 12:34 AM