गडचिरोली : देशवासीयांच्या समग्र विकासासाठी, त्यांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला प्रबुद्ध भारत बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कॅडर कॅम्प मार्गदर्शक इंजि. अरविंद माळी यांनी केले. शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात ओबीसी युवा महोत्सवानिमित्त आयोजित ओबीसी कॅडर कॅम्प व व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले होते. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक प्रा. डॉ. बळवंत भोयर, प्राचार्य जी. एम. दिवटे, ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर उपस्थित होते. देशातील मूळ रहिवासी बहूजन समाज असतानाही राज्यकर्त्यांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना लाचार बनवून दयेवर जगण्यास भाग पाडले. ही बाब देशासाठी लाजीरवाणी आहे. त्यामुळे बहुजन समाजाने वैैचारिक पातळी उंचावून राष्ट्र भावनेसोबतच सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करणारे मानवी मूल्यावर आधारित मिशन उभे करावे, असे आवाहनही अरविंद माळी यांनी केले. डॉ. बळवंत भोयर यांनी ओबीसी समाजातील युवकांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठे अधिकारी बनून समाज विकासासाठी झटावे, देशातील मोठा ग्राहक ओबीसी समाज असल्याने सामूहिक तत्त्वावर मोठे व्यवसाय, उद्योग निर्माण करण्याची संधी समाजातील युवकांना आहे. या संधीचा फायदा घेऊन समाज उत्थानासाठी कार्य करावे, असे आवाहन केले. ओबीसी कॅडर कॅम्पच्या माध्यमातून ओबीसी युवक जागृत होऊन संघटित होईल, असा आशावाद दादाजी चापले यांनी व्यक्त केला. या शिबिराचे संचालन अक्षय ठाकरे, प्रास्ताविक प्रा. शेषराव येलेकर तर आभार नयन कुनघाडकर यांनी मानले. शिबिराला प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. दशरथ आदे, मारोती दुधबावरे, प्रा. राम वासेकर, प्रा. रामटेके, लोकमान्य बरडे, पांडुरंग घोटेकर, पंडित पुडके, दादाजी चुधरी, बांदूरकर, संजय निशाने व ओबीसी बांधव हजर होते. (शहर प्रतिनिधी)
व्यवसाय मार्गदर्शन मेळावा : अरविंद माळी यांचे प्रतिपादन
By admin | Published: April 28, 2017 1:21 AM