गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियान राबविताना शहीद झालेल्या पोलिस जवानांच्या सन्मानार्थ पोलिसांची वीरगाथा सांगत सी-६० दलाच्या पाच कमांडोंनी बाइकवरून २२ दिवसांत ६,५०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या यशस्वी प्रवासाबद्दल मंगळवारी गडचिरोलीत त्यांचा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सत्कार केला.
किशोर खोब्रागडे, अजिंक्य तुरे, देवा अडोले, रोहित गोंगले आणि राहुल जाधव या जवानांनी दि. २६ डिसेंबरला आपल्या बाइक यात्रेला सुरुवात केली. नागपूरच्या झिरो माइल, दीक्षाभूमीला भेट देऊन इंदोर, चित्तोडगड, उदयपूर, अजमेर, जयपूर, बिकानेर, जैसलमेर, लोंगेवाला (युद्धभूमी), कच्छचे रण आणि पश्चिम सीमेवरील शेवटचे गाव कोटेश्वरपर्यंत हे जवान गेले. तेथून भूज, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सुरत, मुंबई, पुणे, नागपूर असा प्रवास करून हे जवान सोमवारी संध्याकाळी गडचिरोलीत दाखल झाले.
या प्रवासात त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांसह दिव-दमण आणि दादरा-नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांनाही भेट दिली. प्रत्येक वर्षी या पद्धतीने बाइकवरून शहीद पोलिस सन्मान यात्रा काढून देशाच्या सर्व राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रवास करणार असल्याचे किशोर खोब्रागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एनसीसी कॅडेट्स, एनजीओंच्या भेटी
- या प्रवासात कमांडोंनी एनसीसी कॅडेट्स, सामाजिक संस्थांना भेट देऊन गडचिरोलीतील नक्षलवाद, पोलिसांची शौर्यगाथा याबद्दल सांगितले. विशेष म्हणजे मुंबई, पुण्याकडील अनेक लोकांना गडचिरोलीबद्दल फारशी माहिती नसल्याचा अनुभव त्यांना आला.
- पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या पत्रामुळे या जवानांचे अनेक ठिकाणी स्वागत झाले. काही ठिकाणी पोलिस मुख्यालयात, कुठे टेंट लावून तर काही ठिकाणी हॉटेलमध्ये या जवानांनी मुक्काम केला.