आवाजच येत नाही : मागील १५ दिवसांपासून निर्माण झाली समस्यागडचिरोली : बीएसएनएलच्या गडचिरोली शहरातील ग्राहकांना मागील १५ दिवसांपासून कॉलड्रॉपच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मध्येच फोन कटण्याबरोबरच आवाज न येण्याची नवीनच समस्या निर्माण झाली आहे. मात्र याकडे बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बीएसएनएलने संपूर्ण जिल्हाभरात मोबाईल टॉवरचे जाळे निर्माण केले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातही मोबाईल टॉवर बांधण्यात आले आहेत. इतर खासगी कंपन्या मात्र केवळ तालुक्याच्या ठिकाणीच सेवा देत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलच्या ग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे. शहरी भागातही बीएसएनएलचेच सर्वाधिक ग्राहक आहेत. बीएसएनएलच्या विविध योजनांमुळे ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या तुलनेत मोबाईल टॉवरची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मात्र मोबाईल टॉवर व त्यांची क्षमता आहे, तेवढीच कायम आहे. परिणामी सध्या कार्यरत यंत्रणेवर लोड पडत असल्याने कॉलड्रॉपची संख्या वाढत चालली आहे. पहिल्यांदा फोन केल्यानंतर सदर फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे तर कधी स्वीच आॅफ असल्याचे सांगते. दोन ते तीनदा प्रयत्न केल्यानंतर फोन लागते. मात्र मध्येच फोन कटत असल्याने आणखी दुसऱ्यांदा फोन लावावा लागतो. ही सर्व कारणे बीएसएनएलच्या ग्राहकांना नित्याचीच झाली आहेत. मात्र मागील १५ दिवसांपासून दोघापैकी एका मोबाईलधारकाचा आवाजच न येण्याची नवीनच समस्या निर्माण झाली आहे. एका व्यक्तीचा आवाज स्पष्ट येत असला तरी दुसऱ्या व्यक्तीचा आवाज येत नाही. त्यामुळे शेवटी फोन बंद करून पुन्हा लावावा लागतो. या सर्व भानगडीमध्ये ग्राहकांचे बरेच पैसे खर्च होत आहेत व त्याचा अनावश्यक भुर्दंड ग्राहकांना उचलावा लागत आहे. हा बिघाड दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)कॉम्प्लेक्स परिसरात थ्री-जी नावापुरतीचगडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्स परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात बीएसएनएलने थ्री-जी यंत्रणा बसविली आहे. मात्र या परिसरात थ्री-जी सेवेची स्पीड मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. अनेक युवक इंदिरा गांधी चौकात येऊन मोबाईलचा वापर करताना दिसत आहेत. थ्री-जी यंत्रणेच्या नावावर बीएसएनएलने लूट चालविली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बीएसएनएलच्या वतीने जिल्हाभरात एका वर्षात २०० च्या वर टॉवर उभारले आहेत. मात्र सदर टॉवरसुध्दा व्यवस्थित काम करीत नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. याकडे बीएसएनएलने गंभीरतेने लक्ष देऊन त्यातील बिघाड दुरूस्त करण्याची मागणी आहे.
कॉलड्रॉपने मोबाईलधारक त्रस्त
By admin | Published: February 08, 2016 1:31 AM