एटापल्ली (गडचिरोली) : नक्षलग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिस दलाकडून जनजागरण मेळाव्यासारख्या कार्यक्रमातून त्यांना मदत केली जाते, हा खरे तर लोकांची मने जोडण्याचा कार्यक्रम आहे. एका बाजूला संरक्षण, तर दुसऱ्या बाजूला समतोल विकास साधण्यासाठी गडचिरोलीपोलिस दल ते प्रयत्न करीत आहे; त्यामुळे या जिल्ह्याला आता नक्षलग्रस्त जिल्हा न म्हणता, ‘विकसनशील जिल्हा’ असे संबोधित करावे, असे कौतुकोद्गार लोकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी काढले.
गडचिरोली पोलिस दलाच्या ‘पोलिस दादालोरा खिडकी’ (पोलिस दादाची खिडकी) या उपक्रमाच्या माध्यमातून बुधवारी (दि. १४) गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या प्रांगणात आयोजित महाजनजागरण मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, सीआरपीएफ १९१ बटालियनचे असिस्टंट कमांडंट हरेकृष्णा, लोकमत नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आदी उपस्थित होते.
यावेळी दर्डा यांनी गडचिरोली पोलिस दल दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासासाठी व समृद्धीकरिता शिक्षण, कृषी, रोजगार मेळावे आयोजित करून, तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी सहली, कृषी मेळावे घेऊन त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून या उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक धनंजय पाटील, कोटमीचे प्रभारी अधिकारी संतोष कदम, उपनिरीक्षक महेश गरड, मंगेश पाटील, अक्षय पाटील, हरिदास जंगले आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सदर मेळाव्यामध्ये नागरिकांना जॉब कार्ड, बँक पासबुक, ई-श्रम कार्ड आणि स्प्रेअर पंपांचे वाटप करण्यात आले. तसेच हद्दीतील गोरगरीब नागरिकांना त्यांच्या जीवनाेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.