लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली/धानाेरा : कोरोना किंवा अन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आराेग्याची काळजी घेणे ही प्रत्येक जवानाची वैयक्तिक जबाबदारी आहे. स्वत:चे आराेग्य सांभाळतानाच बदलत्या नक्षली हालचालींवर लक्ष ठेवून अभियान राबवावे लागणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने परिस्थितीनुसार नक्षलविराेधी अभियान जवानांनी राबवावे, असे निर्देश सीआरपीएफ मुंबई पश्चिम क्षेत्राचे महानिरीक्षक रणदीप दत्ता यांनी दिले. पश्चिम क्षेत्राचा प्रभार सांभाळल्यानंतर दत्ता यांनी नक्षलग्रस्त धानाेरा तालुक्यात बुधवार ३० जूनराेजी दाैरा केला. तसेच येथील सीआरपीएफ ११३ बटालियन कॅम्पला भेट दिली. सर्वप्रथम त्यांना क्वार्टर गार्डवर सलामी देण्यात आली. त्यानंतर आयजी दत्ता यांनी कॅम्पमध्ये फिरून जवानांच्या राहण्याची व्यवस्था, कॅम्पची सुरक्षा, काेराेना प्रतिबंधक वाफ यंत्राची पाहणी केली तसेच वृक्षाराेपण केले. दरम्यान, ११३ बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी आपल्या क्षेत्रात राबविले जाणारे अभियान, सिविक ॲक्शन प्राेग्राम व अन्य कार्यांचा अहवाल आयजींना सादर केला. याप्रसंगी गडचिराेली क्षेत्राचे सीआरपीएफ डीआयजी मानस रंजन, कमांडंट टी. के. हाती, द्वितीय कमान अधिकारी सुमित कुमार, राजपाल सिंह, कुलदीप सिंह, उपकमांडंट सपन सुमन, प्रवीण त्रिपाठी, ए. के. अनस, प्रमोद सिरसाठ, सहायक कमांडंट राजशेखर, तोन सिंह, एसडीपीओ स्वप्निल जाधव, ठाणेदार विवेक अहिरे हजर हाेते.
स्थानिकांचा विश्वास संपादन करा- धानाेरा येथे आयजी दत्ता यांनी सर्व अधिकारी व जवानांशी सैनिक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यानंतर नक्षलग्रस्त भागात कार्यरत जवानांच्या मनाेबलाची त्यांनी प्रशंसा केली. केवळ नक्षल्यांशी सामना करून चालणार नाही, तर दुर्गम भागातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न अधिकारी व जवानांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.
१९२ बटालियन कॅम्पला भेट- सीआरपीएफ पश्चिम क्षेत्राचे पाेलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांनी गडचिराेली येथील १९२ बटालियन कॅम्पला बुधवारी भेट दिली. भेटीदरम्यान त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नक्षलविराेधी अभियान राबविताना आपली वैभवशाली, गाैरवशाली व वीरवृत्ती तसेच शिस्त कायम ठेवावी, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी परिसरात वृक्षाराेपण केले व जवानांसाेबत भाेजन केले. याप्रसंगी सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित हाेते.