गडचिरोली/ सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींसह आणि जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे. यातील बहुतांश ग्रामपंचायती नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि दुर्गम भागातील असल्यामुळे पोलिस दलाच्या हेलिकॉप्टरमधून मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना शुक्रवारीच आवश्यक साहित्यासह रवाना करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी निवडणूक प्रचार थंडावला असला तरी मतदारांशी आपल्या ‘खास’ माणसांमार्फत भेटीगाठी घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करण्याची शक्यता आहे.
सिरोंचा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. तहसील कार्यालयातून मतदान यंत्रांसह आवश्यक इतर साहित्य घेऊन मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सिरोंचा तालुका मुख्यालयातून बामणी पोलिस स्टेशन या बेस कॅम्पपर्यंत तसेच आसर्डी पोलिस स्टेशनच्या बेस कॅम्पपर्यंत हेलिकॉप्टरने नेऊन सोडण्यात आले. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे वाहनातून प्रवास करणे धोकादायक आहे. त्यामुळे मतदान कर्मचाऱ्यांना दोन दिवसांआधीच, शुक्रवारी सकाळी रवाना करण्यात आले.
हे मतदान कर्मचारी आणि केंद्राधिकारी शुक्रवारी बेस कॅम्पवर मुक्कामी राहिल्यानंतर शनिवारी सकाळी निवडणूक होऊ घातलेल्या गावातील केंद्रांवर पोहोचतील. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना वाहनातून नेण्याऐवजी पायी चालवत आडमार्गाने नेले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात नेहमीच नक्षलवादी कारवाया होत असतात. त्यातही निवडणूक प्रक्रियेत नक्षलवाद्यांकडून अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे जिल्हा प्रशासनासमोर एक आव्हान असते.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असली तरी सिरोंचा वगळता इतर तालुक्यांमध्ये २ किंवा ३ ठिकाणीच निवडणूक होत आहे. त्या ठिकाणी आपल्याच गटाच्या उमेदवारांचे वर्चस्व कायम राहावे, यासाठी नेत्यांकडून मदत केली जात आहे. सिरोंचा तालुक्यात ७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, आदिवासी विद्यार्थी संघ यांच्या गटांचे चुरस आहे. त्यामुळे त्या पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.