सामूहिक वनहक्क प्राप्त सनियंत्रण समितीअंतर्गत स्थापित ग्रामसभेचे नियम २०१२ नुसार ग्रामसभांचा महासंघ (महाग्रामसभा)कडून मौजे झेंडेपार येथील प्रस्तावित प्रकल्पासाठी खाण क्षेत्राच्या निरीक्षणाकरिता क्षेत्रीय खाण नियंत्रक अधिकारी येणार आहेत. खाण क्षेत्रांमध्ये येण्या-जाण्यासाठी पांदण रस्ता तयार करणे, जुन्या रस्त्याची साफसफाई करणे व त्यामध्ये मुरूम भरणे, रस्त्यामधील लहान लहान काटेरी झाडांची व कचऱ्याची साफसफाई करणे, गाड्यांना येण्या-जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता तयार करणे, तसेच रोवलेले बाउंड्री पिलर्स दुरुस्त करण्याची १५ दिवसांची परवानगी दिलेली आहे. परंतु ते नमूद क्षेत्र हे पाचव्या अनुसूचित क्षेत्राअंतर्गत येते. या क्षेत्रावर ग्रामसभेचे स्वामित्व अधिकार आहेत.
झेंडेपार येथील खाणीसाठी ३ ऑगस्ट २०१७ रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली. यात ग्रामसभांनी जिल्हा मुख्यालय हे तालुक्याच्या ठिकाणाहून १५० किलोमीटर दूर असतानाही मोठ्या संख्येने उपस्थित राहत खाण प्रकल्पाला विरोध केला. या आधी ९ सप्टेंबर २०११ ला सोहले ग्रामसभेच्या वनक्षेत्रातील खाण प्रकल्पासाठी जनसुनावणी झाली आणि त्यालाही ग्रामसभांनी विरोध केला. त्यामुळे त्या खाणीला परवानगी देण्यात आली नाही. जनसुनावणीमध्ये ग्रामसभांनी विरोध केला असतानाही प्रस्तावित खाणपट्ट्यासाठी दिलेली परवानगी अन्यायकारक आहे. त्यामुळे ती रद्द करावी, अशी मागणी महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडूराम हलामी, सचिव कुमारी जमकातन, उपाध्यक्ष राजाराम नैताम, कोषाध्यक्ष शीतल नैताम, सल्लागार ईजामसाय काटेंगे, नंदकिशोर वैरागडे, सदस्य हिरालाल सयाम, सुखराम उईके, गोविंदसिंग होळी, तानसिंग कुमोटी, सदस्य मथुरा नैताम यांच्यासह निवेदनात स्वाक्षरी केलेल्या ग्रामसभेच्या ४५ लोकांनी केली आहे. हे निवेदन कोरचीचे नायब तहसीलदार बी. एन. नारनवरे यांना देण्यात आले.
(बॉक्स)
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची कृती नियमांना डावलून?
झेंडेपार येथील गाव नमुना ७ प्रमाणे चराई, इमारती, जळावू लाकडाकरिता ग्रामसभेचे परंपरागत अधिकार राखीव होते. परंतु गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २००३ मध्ये हे क्षेत्र खनिजयुक्त असल्याने खाण कार्यासाठी आरक्षित केले आहे. हे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या अधिकारांच्या विसंगत असल्याचे ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचित क्षेत्राच्या तरतुदीविरोधात आहे. या क्षेत्रातील नागरिक निसर्गावर, जंगलावर उपजीविका करतात. या वनात इलाक्यातील ग्रामसभा आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान राव पाठ गंगाराम घाट पेनचे स्थान आहे. ज्या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते. मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील लोक येऊन पूजा करतात.
(बॉक्स)
१०१७ हेक्टर क्षेत्रावर १२ खाणी प्रस्तावित
कोरची तालुक्यात झेंडेपार प्रस्तावित खाण प्रकल्प एकमेव नाहीतर आगरी, मसेली, सोहले, बोडेणा, नांदळी आणि भरीटोला येथे एकूण १०१७ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर १२ खाण प्रकल्प प्रस्तावित आहेत. ज्यांचा एकत्रित विचार केला तर निसर्गावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन नैसर्गिक संसाधनापासून मिळणारा रोजगार हिरावला जाणार आहे. त्यामुळे अशा खाण प्रकल्पाचा कोरची तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण ग्रामसभा सामूहिकपणे विरोध करीत आहे.