पेसा अंतर्गत भरती : ६५ जागांसाठी १८३ उमेदवार चालले पायीगडचिरोली : गडचिरोली वनवृत्त कार्यालयांतर्गत पेसा अंतर्गत वनरक्षकांच्या ६५ जागांसाठी अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांची धावण्याची चाचणी शनिवारी घेण्यात आली. या दरम्यान वनरक्षक बनण्यासाठी मुले, मुली मिळून तब्बल १८३ उमेदवारांनी वनविभागाने घेतलेली चालण्याची चाचणी दिली. गडचिरोली वनवृत्त कार्यालयांतर्गत पेसा क्षेत्रातील वनरक्षक पदाच्या भरतीसाठी जुलै महिन्यात वर्तमानपत्रात जाहीरात देऊन अर्ज मागविण्यात आले. या वनरक्षक भरतीसाठी जिल्हा भरातून जवळपास ५०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर वन विभागाने वनरक्षकांच्या ६५ जागांसाठी १८३ उमेदवारांना चालण्याच्या चाचणीसाठी पात्र ठरविले. दरम्यान मध्यंतरीच्या कालावधीत वन विभागामार्फत पेसा क्षेत्रातील वनरक्षक पदाचे रोस्टर अद्यावत करण्यात आले नव्हते. वन विभागाने तब्बल चार महिन्यांच्या कालावधीत पेसा क्षेत्रातील वनरक्षक पदांचे रोस्टर पूर्ण केले. त्यामुळे वन विभागामार्फत वनरक्षकाच्या ६५ जागांसाठी पात्र ठरलेल्या १८३ आदिवासी उमेदवारांना चालण्याच्या चाचणीसाठी पत्राद्वारे बोलविण्यात आले. दरम्यान चालण्याची चाचणी देण्यासाठी शनिवारी सकाळीच आदिवासी उमेदवार चामोर्शी मार्गावर दाखल झाले. येथे कागदपत्रांची पुनर्तपासणी करून चालण्याची प्रक्रिया वन विभागामार्फत अडीच तासात पूर्ण करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)मुलांसाठी २५ तर मुलींसाठी १६ किमी अंतरवन विभागाच्या वतीने येथील चामोर्शी मार्गावर शासकीय विज्ञान महाविद्यालय येथून गोविंदपूरपर्यंत चालण्याची चाचणी घेण्यात आली. गडचिरोलीपासून गोविंदपूरचे अंतर साडेबारा किमी आहे. आदिवासी मुलांसाठी गोविंदपूरपर्यंत चालत जाणे व येणे अशी २५ किमीचे अंतर ठेवण्यात आले. तर मुलींसाठी १६ किमी अंतर ठेवण्यात आले. यात जाणे ८ किमी व येणे ८ अशी चार तासाच्या अवधीची चाचणी घेण्यात आली. सध्या कडाक्याची थंडी असूनही नोकरीच्या आशेपोटी १८३ आदिवासी उमेदवार वन विभागाच्या आजच्या चालण्याच्या चाचणीत सहभागी झाले होते.
वनरक्षक चाचणीसाठी उमेदवारांची गर्दी
By admin | Published: December 27, 2015 1:41 AM