लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे अनेक उद्याेगांचे कंबरडे माेडले. लाॅकडाऊनमुळे अनेक उद्याेग बंद पडले. पुणे, मुंबई, नागपूर व इतर माेठ्या शहरांमध्ये राेजगारासाठी गेलेले युवक काेराेनामुळे परत आले. आता हे युवक बेराेजगारीचा सामना करीत आहेत. जिल्ह्यात शेती आणि मर्यादित असलेल्या खासगी नोकरीवर आता त्यांना वेळ मारून न्यावी लागत आहे. गडचिराेली जिल्ह्यात एकही माेठा उद्याेग नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यात शेती व शेतीवर आधारीत दुसरा काेणताच राेजगार उपलब्ध नाही. यातून मार्ग काढत काही युवक नागपूर, पुणे, मुंबई किंवा दुसऱ्या राज्यातील कंपन्यांमध्ये मिळेल ते काम करीत हाेते. वेतन जरी कमी मिळत असले तरी राेजगाराची समस्या सुटली हाेती. मात्र काेराेनाच्या कालावधीत शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. या कालावधीत कंपन्या बंद ठेवण्यात आल्याने हा वर्ग गावाकडे परत आला. काेराेनातून सावरत अनेक कंपन्या सुरू झाल्या. मात्र पाहिजे तेवढी उलाढाल हाेत नसल्याची परिस्थिती आजही कायम आहे. त्यामुळे परत आलेले युवक पुन्हा कामावर जाण्यासाठी तयार नाहीत. त्यांना आता बेराेजगारीचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी आपला पारंपारीक व्यवसाय सुरू केला आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक नागरिक शेतीत काम करीत असल्याने छुप्या बेराेजगारीचे प्रमाण वाढले आहे. २०२० हे वर्ष सर्वाधिक बेराेजगारी निर्माण करणारे वर्ष ठरले आहे. स्थानिक स्तरावरील आर्थिक ताळमेळ बिघडला असल्याने अनेक उद्याेजकांनी मजूर कपातीचे धाेरण स्वीकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्यांनाही काही प्रमाणात बेराेजगारीचा सामना करावा लागत आहे. येणाऱ्या नवीन वर्षात स्वयंरोजगार उभारण्यास चालना देऊन चांगले मार्गदर्शन मिळाल्यास अनेकांच्या हाताला काम मिळू शकते.
उद्याेग स्थापनेचा मुहूर्त वर्षभर पुढे ढकललागडचिराेली जिल्ह्यात माेठा उद्याेग नसला तरी अनेक लहान उद्याेग आहेत. यातूनच बऱ्यापैकी राेजगार उपलब्ध हाेतो. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देऊन बाजारपेठ खुली झाली असली तरी अजुनही बाजारपेठेत पूर्वीएवढा उत्साह नाही. त्यामुळे बाजारपेठेत उलाढाल नाही. नवीन उद्याेग टाकताना प्रस्थापित उद्याेजकांसाेबत स्पर्धा करावी लागते. ती हिम्मत कोरोनाने हिरावली आहे. त्यामुळे नवीन उद्याेजक स्पर्धा करू शकत नसल्याने अनेकांनी उद्याेग स्थापनेचा मुहूर्त किमान वर्षभर पुढे ढकलला आहे.