गडचिराेली : काेराेनामुळे मागील वर्षभराच्या कालावधीत एकूण ७१९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४२.२८ टक्के म्हणजेच ३०४ रुग्णांना अगाेदरच विविध प्रकारचे गंभीर आजार हाेते. या आजारांना काेराेनाची साथ मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५७.७२ टक्के म्हणजेच ४१५ नागरिकांना काेणत्याही प्रकारचा आजार नव्हता. ते काेराेनामुळे दगावले.
काेराेनाच्या पहिल्या लाटेत बाधितांची संख्या कमी हाेती. तसेच मृत्यूची संख्याही कमी हाेती. केवळ १०३ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेने मात्र कहर केला. या लाटेत ६१६ जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयंकर मानली जाते. त्यातही जे नागरिक पूर्वीच विविध आजारांनी ग्रस्त हाेते, त्यांना काेराेनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला. काेराेनाच्या पहिल्या लाटेत आजारग्रस्त व वयाेवृद्ध नागरिकच मरण पावले. मात्र, दुसऱ्या लाटेत ४० वर्षे वयाेगटातीलही नागरिकांचा जीव गेला आहे. आता लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी नागरिकांनी याेग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
बाॅक्स....
सर्वात जास्त रुग्ण हायपरटेंशनचे
- एकूण ३०४ मृतकांमध्ये ११८ नागरिकांना हायपरटेंशन हाेते. ८७ नागरिकांना हायपरटेंशन व मधुमेहाचा त्रास हाेता. ४९ मधुमेहग्रस्त, ७ लिव्हर डिसीज, ३ कॅन्सर व ७ किडनी डिसीज तसेच २५ इतर राेगांनी ग्रस्त असलेल्यांचा मृत्यू झाला आहे.
- बदललेल्या जीवनशैलीमुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. या रुग्णांसाठी काेराेना घातक ठरण्याची शक्यता आहे.
बाॅक्स...
काेणत्या आजाराचे किती रुग्ण
राेग रुग्ण
हायपरटेंशन ११८
हायपरटेंशन व मधुमेह ८७
मधुमेह ४९
हृदयराेग ०८
लिव्हर डिसीज असलेले ०७
कॅन्सर ०३
किडनी डिसीज ०७
इतर २५
एकूण ३०४
बाॅक्स...
वयाेगटनिहाय बाधित रुग्ण व मृत्यू
वय बाधित मृत्यू
०-१ ७९ २
२-१० १०५७ ०
११-२० २८०८ २
२१-३० ६८६२ २४
३१-४० ६८१४ ७४
४१-५० ५०३९ १३९
५१-६० ३६३९ १८६
६१-७० १९५७ १९७
७१-८० ५४४ ७६
८१-९० १०१ १९
९१-१०० १० ००
एकूण २८९१० ७१९
बाॅक्स...
९१ वर्षांवरील सर्वच रुग्णांनी काेराेनाला हरविले
९१ वर्षांच्या वरील नागरिकांना हायपरटेंशन, मधुमेह आदी आजार असतात. तसेच शरीर कमजाेर असल्याने काेराेनाचा सर्वाधिक धाेका या नागरिकांना असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात हाेते. गडचिराेली जिल्ह्यातील ९१ पेक्षा अधिक वयाच्या १० नागरिकांना काेराेनाची लागण झाली. मात्र, त्यातील एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, हे विशेष.