लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा जिल्ह्यात प्रसार रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रवाशांसाठी काही बंधने घातली आहेत. हॉटस्पॉट ठरलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना आपल्यासोबत आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट ठेवावा लागणार आहे. हवाई मार्गे, रेल्वे मार्गे आणि रस्ते मार्गे येणाऱ्या सर्व प्रवाशांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे.सर्व स्थानिक प्रवाश्यांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. तो रिपोर्ट प्रवासापूर्वी व प्रवासानंतर विमानतळावर दाखविणे बंधनकारक असेल. विमानतळ प्राधिकरणाला प्रवासापूर्वी प्रवाश्यांचे कोरोना चाचणी अहवाल पडताळणी करणे बंधनकारक राहील. रिपोर्ट नसलेल्या विमान प्रवाश्यांना विमानतळावर स्वखर्चाने आरटीपीसीआर तपासणी करणे अनिवार्य राहणार आहे. याकरीता विमानतळ प्रधिकरणाने चाचणी केंद्राची व्यवस्था केली असून प्रवाश्यांकडून चाचणीसाठी थेट शुल्क आकारण्यास मुभा राहणार आहे. विमानतळावर चाचणी झाल्यानंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. मात्र प्रवाश्यांना त्यांचे संपर्क क्रमांक व घरचा पत्ता द्यावा लागणार आहे.विमानतळावर ज्या प्रवाश्यांचा अहवाल सकारात्मक येईल त्यांना कोविड १९ च्या प्रोटोकॉलप्रमाणे उपचार /वागणूक दिली जाईल. वरिल मानक प्रणाली/मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी संबंधित तहसीलदार हे नोडल अधिकारी असतील. वरील चार राज्यांमधून रेल्वेने जिल्ह्यात येणारे प्रवासी किंवा रेल्वेस्थानकात मुक्कामी/थांबा असणाऱ्या सर्व प्रवाश्यांना, रेल्वेव्दारे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाश्यांना आरटीपीसीआर तपासणी अहवाल (निगेटिव्ह) सोबत बाळगणे बंधनकारक राहणार आहे. तो अहवाल ९६ तासापूर्वी केलेला असणे आवश्यक राहील. प्रवाश्यांची रेल्वे स्थानकावर तापमान व कोविड-१९ च्या लक्षणांची तपासणी करण्यात येईल. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातून घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. कोविड १९ ची लक्षणे असलेल्या प्रवाश्यांची अँटिजेन तपासणी करण्यात येईल. तसेच अँटिजेन तपासणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर प्रवाश्यांना घरी जाण्याची परवानगी राहील.
‘त्या’ प्रवाशांना करावा लागणार कोविड सेंटरमधील खर्चकोविड १९ ची तपासणी न केलेल्या/ सकारात्मक आढळलेल्या प्रवाशांना पुढील काळजी घेण्यासाठी कोविड केअर सेंटर येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच तिथे दाखल झालेल्या प्रवाश्यांना तेथील सर्व खर्च स्वत: अदा करावा लागणार आहे. या मानक प्रणाली/ मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी संबंधित तहसिलदार हे नोडल अधिकारी असतील.
आरोग्य अधिकाऱ्यांवर जबाबदारीवरील चार राज्यांमधून रस्ते मार्गाने जिल्ह्याच्या सिमेत येणाऱ्या प्रवाशांच्या शरीराचे तापमान व कोविड १९ ची लक्षणे असल्याची तपासणी इत्यादी बाबींचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहणार आहे. कोविड-१९ ची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना जिल्ह्यात दाखल होण्याची परवानगी देण्यात येईल. परंतु कोविड १९ ची लक्षणे असलेल्या प्रवाश्यांना परत त्यांच्या मुळ ठिकाणी/ घरी जाण्याचा पर्याय देण्यात येईल.