झिंगानूर-सिरकाेंडा मार्गावर असलेल्या कोरेतोगू नाल्यावर सध्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे याच मार्गाने मालवाहक वाहनांची वर्दळ वाढली आहे. याशिवाय नियमित वाहतूकही याच मार्गाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील गिट्टी उखडली आहे. मार्गाच्या नूतनीकरणाची मागणी मागील दाेन ते तीन महिन्यांपासून केली जात आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे. कोरेतोगू नाला परिसरात सर्वांत मोठा आहे. ‘लाेकमत’ने पूल बांधकामासाठी वेळाेवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे या नाल्यावर पूल बांधकामाची मंजुरी मिळाली. त्यानंतर आता येथील काम प्रगतिपथावर आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच मामीडीतोगू नाल्यावर पुलाचे बांधकाम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले आहे. आता कंडीपहाडी नाला तसेच नैनगुडा नाल्यावर पूल बांधकामाची आवश्यकता आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या भागात पुलांचे बांधकाम करावे, तसेच झिंगानूर-सिरकाेंडा मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
पावसाळ्यात वाहतूक ठप्प
सिराेंचा तालुक्यात अद्यापही पक्के रस्ते बांधण्यात आले नाहीत. अनेक रस्ते मातीमय आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना सर्वाधिक त्रास हाेताे. तालुक्यातील झिंगानूर परिसर अत्यंत दुर्गम आहे. या तालुक्यातील अनेक नाल्यांवर पुलाचे बांधकाम अद्यापही झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुरामुळे अनेकदा वाहतूक ठप्प पडते. याचा फटका नागरिकांना बसताे. त्यामुळे पावसाळ्यात रहदारीस बाधा आणणाऱ्या नाल्यांवर पुलांचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.