अहेरी : येथून तीन किमी अंतरावर असलेल्या चेरपल्ली गावातील विद्युत ट्रान्सफार्मरचे खांब वाकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सदर ट्रान्सफार्मर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. चेरपल्ली गावातील ताराबाई वाघाडे यांच्या शेतात ट्रान्सफार्मरवरून चेरपल्ली, पुसुकपल्ली, गडबामणी या गावांना विद्युत पुरवठा केला जातो. ट्रान्समार्फर ज्या खांबांवर ठेवण्यात आला आहे त्यापैकी एक खांब पूर्णपणे वाकला आहे. त्यामुळे ट्रान्सफार्मर जमिनीच्या बाजुकडे वाकला आहे. त्याचबरोबर डीपी सुद्धा जमिनीकडे वाकली आहे. महत्त्वाचे म्हणजे सदर डीपी जमिनीपासून अत्यंत कमी उंचीवर आहे. लहान बालकांचे सहज हात या डीपीपर्यंत पोहोचू शकतात. डीपीचे झाकन पूर्णपणे तुटले असून सदर डीपी वर्षभर उघडी राहते. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्याच्या दरम्यान वादळामुळे वाकलेले खांब पुन्हा वाकून ट्रान्सफार्मर खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर ट्रान्सफार्मर शेतामध्ये लावण्यात आले आहे. पावसाळ्यादरम्यान ट्रान्सफार्मर खांबाच्या जागेपर्यंत नेण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे वीज विभागाने वेळीच लक्ष घालून वीज खांब दुरूस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत लाईनमनला सूचना देण्यात आली आहे. मात्र लाईनमनसह वीज विभागाचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)
चेरपल्लीत जनित्र कोसळण्याच्या स्थितीत
By admin | Published: May 31, 2016 1:18 AM