गडचिराेली : नागरिकांचे बळी घेणाऱ्या वाघाला वनविभागाने तात्काळ पकडावे, अन्यथा वनसंरक्षक कार्यालयासमाेर माेर्चा काढला जाईल, असा इशारा धुंडेशिवणी येथील नागरिकांनी दिला आहे. गावकऱ्यांच्यावतीने वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मागील ११ महिन्यात गडचिराेली तालुक्यातील १२ नागरिकांचा जीव वाघाने घेतला आहे. शेतात जाणाऱ्या नागरिकांवरही वाघ हल्ले करत आहे. मात्र वनविभाग केवळ वाघाला पकडण्यासाठी उपाययाेजना करीत असल्याचे सांगून वेळ मारून नेत असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी धुंडेशिवणी येथे चिंतन बैठक आयाेजित केली. या बैठकीला आ.देवराव हाेळी, भ्रष्टाचार विराेधी जनआंदाेलनाचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, राज्य समिती विश्वस्त डाॅ. शिवनाथ कुंभारे, समाजसेवक देवाजी ताेफा, पं.स.सभापती माराेती इचाेडकर, उपसभापती विलास दशमुखे, पं.स.सदस्य रामरतन गाेहणे, आंबेशिवणीचे सरपंच याेगेश कुडवे, सरपंच भावना फुलझेले, प्रीती गेडाम आदी उपस्थित हाेते. या सर्वांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले नामदेव गुडी व दयाराम चुधरी यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन भ्रष्टाचार विराेधी जनआंदाेलनाचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी दिले. तसेच नामदेव गुडी व दयाराम चुधरी यांच्या कुटुंबाला आ.डाॅ.देवराव हाेळी, डाॅ.शिवनाथ कुंभारे, विजय खरवडे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली.