सिरोंचातील वॉर्ड नं. ३ मध्ये दारूविक्रेते सक्रिय आहेत. सध्या वाॅर्डात चोरट्या मार्गाने दारू मिळत असल्यामुळे शहरातील मद्यपी दारू विक्रेत्यांच्या घरी येतात. वाॅर्ड समितीने दारू विक्रेत्यांना नोटीस व तोंडी सांगून सुद्धा न जुमानता दारू विक्री सुरूच ठेवली आहे. प्राप्त माहितीच्या आधारे सिरोंचा पोलीस व मुक्तिपथ चमूने वाॅर्डातील एका घराची झडती घेतली असता, विदेशी कंपनीच्या १६ निपा आढळून आल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार गावळे व त्यांच्या सहकार्यांनी केली.
बाॅक्स...
दोन खर्रा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
सिरोंचा शहरात चोरट्या मार्गाने खर्रा विक्री करणाऱ्या दोघांवर सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस व मुक्तिपथने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमुळे शहरातील खर्रा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मदनिश बाकेवार, नवीन डिकोंडा या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र आदेशाची पायमल्ली करीत शहरात छुप्या मार्गाने खर्रा विक्री सुरुच आहे. शहरातील मदनीश बाकेवार घरातून खर्रा विक्री करीत असल्याची माहिती मिळताच घराची तपासणी करून ५ हजार रुपये किमतीची खर्रा घोटण्याची मशीन जप्त करण्यात आली. मच्छी मार्केट मधील केळीच्या दुकानाचा आसरा घेत खर्रा विक्री करणाऱ्या नवीन डिकोंडा याच्याकडून २२ खर्रे जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही विक्रेत्यांवर सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.