कोरेगाव येथील शेतकऱ्यांना लाभ : जलयुक्त शिवार अभियानातून बंधाऱ्याचे बांधकाम जोगीसाखरा : आरमोरी तालुका कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेतून कोरेगाव येथील नाल्यावर सिमेंट बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात पाणी साचून राहत असल्याने सदर बंधारा वन्यजीव, पक्षी यांच्यासाठी वरदान ठरला आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १४ लाख रूपये खर्चुन बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले आहे. या बंधाऱ्यामुळे मे महिन्यात सुद्धा पाणी साचून आहे. बंधाऱ्याच्या सभोवताल शेती असल्याने बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेतीला होणार आहे. मार्च, एप्रिलपर्यंत या बंधारा भरून पाणी येते. वन्य पशूंसाठी या बंधाऱ्यातील पाणी जीवनदायी ठरले आहे. त्याचबरोबर गायी, म्हशी, शेळ्या आदी पाळीव जनावरांचीही तहाण भागवत आहे. कोरेगाव ग्राम पंचायतीअंतर्गत मागील वर्षी अंदाजे ३० शेततळे व ६ सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. कोरेगाव परिसरातील ९० टक्के शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. धानाला शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. मात्र तलाव व बोड्या सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यातच कोरड्या पडत असल्याने एका पाण्याने येथील पीक करपत होते. दरवर्षीच्या या समस्येमुळे कोरेगाव परिसरातील शेतकरी त्रस्त झाले होते. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेततळे व सिमेंट बंधाऱ्यांचे काम करण्यात आल्याने अडचणीच्या वेळी या बंधाऱ्याचे पाणी शेतकऱ्यांना वापरता येणार आहे. धान पीक निघल्यानंतरही या ठिकाणी पाणी राहत असल्याने शेतकरीवर्ग भाजीपाला व इतर पिकांचे उत्पादन घेऊ शकणार आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी दुबार पीक घ्यावे, असे आवाहन सरपंच जिजाबाई उसेंडी यांनी केले आहे. कोरेगाव परिसरात वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात तलाव, बोड्या व इतर जलसाठे कोरडे पडत असल्याने वन्यजीव गावाकडे धाव घेत होते. गावाच्या सभोवताल बंधारे झाले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचून असल्याने वन्यजीव आपली तहाण या पाणवट्यांवर भागवू शकणार आहेत. कृषी विभागाच्या कार्याचे नागरिकांनी प्रशंसा केली आहे. (वार्ताहर)
सिमेंट बंधारा पशुंसाठी ठरला वरदान
By admin | Published: May 05, 2017 1:13 AM