सिराेंचा : शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदीची मर्यादा प्रतिएकर १६ क्विंटल करावी, या मागणीसाठी सिराेंचा येथील शेतकऱ्यांनी आंदाेलन केले हाेते. आंदाेलन करून १६ दिवसांचा कालावधी उलटला तरी शासनाने धान खरेदी मर्यादा वाढीबाबत निर्णय घेतला नाही. परिणामी धानाची खरेदी प्रक्रिया बंदच आहे. त्यामुळे येथील खरेदी केंद्र परिसरात धान पाेत्यांचे ढिगारे कायम आहेत. येथील आविका संस्थेच्या केंद्राच्या परिसरात पटांगणावर शेतकऱ्यांनी धानाने भरलेली पाेती रचून ठेवली आहेत. धान खरेदी मर्यादेचा निर्णय हाेताच आपला नंबर लागेल, अशी आशा करून शेतकरी काटा हाेण्याची प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान, ५ जानेवारी राेजी प्रस्तुत प्रतिनिधीने दुपारच्या सुमारास या केंद्राला भेट दिली असता, खरेदी बंद असल्याचे दिसून आले. पाेत्यांची थप्पी कायम आहे. आविका संस्थेने कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाेदाम व एक खाेली धान खरेदीच्या कामासाठी भाड्याने घेतली आहे. गतवर्षी सन २०१९-२० या हंगामात या केंद्रावर प्रतिएकर १६ क्विंटलप्रमाणे धान खरेदी करण्यात आली हाेती. मात्र यावर्षी शासनाने खरेदीची मर्यादा कमी करून या वर्षी ती ९.६० क्विंटल केली. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन खरेदीची मर्यादा वाढ हाेईपर्यंत धानाची विक्री करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील केंद्राचा परिसर धान पाेत्यांच्या थप्पीने फुल्ल झाला आहे.
धान खरेदी मर्यादावाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी २१ डिसेंबर राेजी नारायणपूर (कारसपल्ली)च्या मुख्य रस्त्यावर चक्का जाम आंदाेलन केले हाेते. या आंदाेलनाला १६ दिवसांचा कालावधी उलटूनही शासनाने धान खरेदी मर्यादावाढीचा निर्णय घेतला नाही.
बाॅक्स ....
१३ गावांतील शेतकरी प्रतीक्षेत
आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सिराेंचा येथे आधारभूत धान खरेदी केंद्र आहे. या केंद्रांतर्गत सिराेंचा रै, सिराेंचा माल, नगरम, रामक्रिष्णापूर, चिंतलपल्ली, मंडलापूर, रामांजपूर, जानमपल्ली, मद्दीकुंटा, आदीमुत्तापूर, नंदीगाव, लक्ष्मीपूर व तमडाला, आदी गावांचा समावेश आहे. सिराेंचा येथील केंद्रावर शेतकऱ्यांच्या निर्णयानुसार धानाचा काटा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आले असून ते शासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
बाॅक्स ....
धानाच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण
धान खरेदी केंद्राच्या परिसरात सिराेंचा भागातील अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पाेत विक्रीसाठी आणून ठेवले आहेत. पाळी व वन्य प्राण्यांपासून या धानाचे नुकसान हाेऊ नये, याकरिता सभाेवतीचे खांब गाळून तारेचे कुंपण तयार करण्यात आले आहे. धानाची काही पाेती ताडपत्री झाकून सुरक्षित ठेवण्यात आले आहेत; तर बहुतांश पाेती खुल्या स्वरूपात आहेत.