लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : ब्रिटिश कालावधीत स्थापना झालेल्या चामोर्शी येथील जि.प.केंद्र शाळेला भौतिक सुविधांची प्रशासनाने पूर्तता केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी ५ फेब्रुवारी रोजी शाळेला कुलूप ठोकले. दुसऱ्या दिवशी बुधवारी आ.डॉ.देवराव होळी यांच्यासह अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन पालक व शाळा समिती सदस्यांसोबत चर्चा केली. शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुलूप काढण्यात आले.तालुका मुख्यालयासह आजूबाजूच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन ब्रिटिशकालीन काळात १९१५ मध्ये शाळेची स्थापना केली. या शाळेतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये या शाळेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेची इमारत कौलारू असून सध्य:स्थितीत २८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.काही वर्ग स्लॅबच्या इमारतीत भरतात तर काही वर्ग कौलारू वर्गखोल्यांमध्ये भरविले जातात. सदर इमारती अतिशय जुनी असल्याने काही फाटे मोडकळीस आले आहेत. कौलारू इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्यासाठी खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परंतु पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र शताब्दी महोत्सव साजरा केलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेपर्यंत या योजना पोहोचू शकल्या नाहीत. जीर्णावस्थेत असलेल्या वर्गखोल्यांमध्ये बसून विद्यार्थी ज्ञान करीत आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी ५ फेब्रुवारी रोजी शाळेला कुलूप ठोकले.यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेत शाळा दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, क्रीडा साहित्य, रंगरंगोटीसाठी निधी द्यावा, नाल्यांवर स्लॅब टाकावे, वॉटर फिल्टर, संगणक कक्ष बांधकाम, नवीन वर्गखोल्या, शौैचालय व मुत्रीघर बांधून द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. पत्रकार परिषदेला नगर पंचायत उपाध्यक्ष राहुल नैताम, आशिष पिपरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होमदास झरकर, उपाध्यक्ष किशोर मोते, सदस्य वंदना ठोंबरे, मालनी पोगुलवार, बंडू सोरते, साईनाथ आडपवार, सतीश गट्टीवार, प्रल्हाद कुलसंगे, नानाजी सातपुते, सुनील देवतळे, केशव बोडावार, सुधाकर राजापुरे, कवडू गट्टीवार, प्रवीण कुनघाडकर, किशोर वनमाळी, कालिदास बुरांडे, दिवाकर पोहरकर, जाणकिराम मडावी यांच्यासह पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ.डॉ.देवराव होळी यांनी दिले.शिक्षकांना बुधवारी थांबावे लागले दरवाजाबाहेरचशाळेची नवीन इमारत बांधावी, या मुख्य मागणीसाठी मंगळवारी शाळेला कुलूप ठोकण्यात आले. मंगळवारी सायंकाळपर्यंत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे मुख्य दरवाजाला ठोकलेले कुलूप कायम ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी बुधवारी शिक्षक आले असता, शाळेला कुलूप ठोकला असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिक्षक शाळेच्या मुख्य दरवाजासमोरच बसले. शाळेला कुलूप ठोकले असल्याची माहिती आ.डॉ.देवराव होळी यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी शाळा गाठली. त्यांच्यासोबत शिक्षण विभागाचे व पंचायत समितीचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुलूप उघडण्यात आले.
चामोर्शीतील केंद्र शाळेचे कुलूप उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 1:25 AM
ब्रिटिश कालावधीत स्थापना झालेल्या चामोर्शी येथील जि.प.केंद्र शाळेला भौतिक सुविधांची प्रशासनाने पूर्तता केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी ५ फेब्रुवारी रोजी शाळेला कुलूप ठोकले. दुसऱ्या दिवशी बुधवारी आ.डॉ.देवराव होळी यांच्यासह अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन पालक व शाळा समिती सदस्यांसोबत चर्चा केली.
ठळक मुद्देआमदारांची शाळेला भेट : नवीन इमारत बांधण्याची मागणी; भौतिक सुविधा उपलब्ध करून द्या