लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यात सर्वाधिक नक्षलप्रभावित आणि आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने ५३५ कोटी १६ लाख रुपये निधी उपलब्ध करण्याची मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.ना.मुनगंटीवार यांनी गुरूवारी ना.राजनाथ सिंह यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के लोक आदिवासी आहेत. मानव विकास निर्देशांकातसुध्दा जिल्हा मागे आहे.जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याची तसेच जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून मानव विकास निर्देशांक वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विविध बाबींसाठी निधीची गरज असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.सदर मागणी तपासून निधीच्या उपलब्धतेबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.
दळणवळण सोयींसह विद्यापीठाचा विकासजिल्ह्यात रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी २०० कोटी रू., मोबाईल तसेच इंटरनेट कनेक्टीव्हिटीसाठी ४५ कोटी ४२ लाख रूपये, सिंचन व्यवस्थेसाठी ३६ कोटी रूपये, पोलीस यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी १४ लाख रू., गोंडवाना विद्यापीठासाठी २४० कोटी रुपये निधी याप्रमाणे ५३५ कोटी १६ लाख रूपये निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली.