गडचिराेली, आरमाेरी, कुरूड : पावसाळ्यात पुरामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने गुरूवारी देसाईगंज आणि आरमाेरी तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. चार महिन्यांपूर्वी वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन अधिकारी शेताच्या बांधावर गेले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती जाणून घेतली.
पावसाळ्यादरम्यान मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडल्याने गोसेखुर्द प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागले होते. परिणामी वैनगंगा नदीला महापूर येऊन त्याचा फटका देसाईगंज, आरमाेरी, गडचिराेली व चामाेर्शी या चार तालुक्यांना बसला. नेमके किती नुकसान झाले याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरूवारी गडचिराेली जिल्ह्यात दाखल झाले. देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा व आरमाेरी तालुक्यातील देऊळगाव येथील शेतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी गडचिरोलीत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
आरमाेरी तालुक्यातील देऊळगाव येथील शेतकरी प्रकाश ठाकरे यांच्याशी संवाद साधताना ठाकरे यांनी पुरामुळे शेतीचे माेठे नुकसान झाले. मात्र शासनाने अजूनपर्यंत मदत दिली नाही, अशी आपबिती सांगितली. पुरात पीक वाहून गेले, मग नाेव्हेंबरमध्ये धानाची कापणी कशी केली, असा प्रश्न एका अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना विचारला असता, जनावरांना चारा आवश्यक असल्याने धानाची कापणी केली असे उत्तर दिले. मागील वर्षी सव्वा एकरात २५ पाेते धान झाले हाेते, तर यावर्षी दाेन ते तीन पाेतेही धान झाले नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली. शेतीचे नुकसान हाेऊनही अजूनपर्यंत पुरेशी मदत मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर अजून मदत मिळेल, असा आशावाद अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय पथकात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहसचिव रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. काैल यांचा समावेश आहे. त्यांच्यासाेबत विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, देसाईगंजचे तहसीलदार संताेष महाले उपस्थित हाेते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व चंद्रपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित हाेते.
बाॅक्स
चार महिन्यानंतर काय पुरावे मिळणार?
चार महिन्यांपूर्वी पूर आला हाेता. धानाच्या शेतीत पूर शिरल्याने धानपीक वाहून गेले. पाऱ्यांवर लावलेले पाेपट, तूर, उडीद, मूग आदी पिके पूर्णपणे नष्ट झाली. धान पिकाची कापणी, मळणी हाेऊन काही शेतकरी धानाची विक्री करीत आहेत. तब्बल चार महिन्यानंतर पथकाने पाहणी केली. त्यामुळे पुरात नष्ट झालेल्या पिकाचे आता काय पुरावे मिळणार? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. गडचिराेली, चामाेर्शी या तालुक्यांना सुध्दा पुराचा फटका बसला आहे. या तालुक्यांनाही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
२३७ काेटींच्या मदतीचे वाटप
- पुरामुळे २९९ गावे प्रभावित झाली हाेती. त्यामध्ये २४ हजार ६७६ शेतकऱ्यांच्या १८ हजार २६३ हेक्टरवरील धान व ३ हजार ९२९ हेक्टरवरील कापूस असे एकूण २२ हजार १९३ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यासाठी शासनाकडून २३७ काेटी रुपयांची मदत मंजूर झाली. त्यातील ९९.४९ टक्के निधी वितरित झाला आहे. घरांची पडझड झालेल्या आणि ४८ तासापर्यंत घरात पाणी साचलेल्या ६४५ कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रतीकुटुंब १० हजार रुपयेप्रमाणे ६४ लाख ६६ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले.
- गडचिराेलीतील एकाचा पुरात मृत्यू झाला. त्याला चार लाख रुपयांची मदत दिली. पाळीव जनावरांचा मृत्यू, घरांची पडझड अशा नुकसानीसाठी ९.७३ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीदरम्यान पथकाला दिली. पुरामुळे सार्वजनिक इमारती, रस्ते, महावितरण यांचे नुकसान झाले. त्यांना अजून निधी मंजूर झाला नाही, असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
एक दिवसाने वाढविला दौरा
दोन सदस्यीय या केंद्रीय पथकाचा नियोजित दौरा गुरूवारी एकच दिवस होता. पण या पथकाने एक दिवस अजून दौरा वाढविला. शुक्रवारी हे पथक गडचिराेली आणि आरमाेरी तालुक्यातील आणखी काही गावांना भेटी देणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी रवाना हाेणार आहे.