मागील वर्षांपासून राज्य शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रांना धान खरेदी करण्याचे आदेश देऊन भरडाई करण्याच्या आदेशाला विलंब केला. भरडाई न झाल्यामुळे नियम व निकषानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात धान चुकाऱ्याची रक्कम जमा करायलाही विलंब लागला. अद्यापपर्यंत शासनाने जाहीर केलेली बोनसची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. एवढेच नव्हे तर या वर्षीच्या रब्बी हंगामातील धान पिकांची खरेदी करुन दोन महिन्यांचा कालावधी लोटून ही धान चुकाऱ्याची रक्कम खात्यात जमा केली नाही. कोरोना महामारीच्या काळात बाजारात कुणीही उधारी वस्तू द्यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांना रोवणी, निंदन, खत व औषधी पिकासाठी पुरवठा करणे अशक्य झाले.
तत्काळ धान चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत या मागणीसाठी आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज येथील भुयारी मार्गा समोर चक्का जाम आंदोलन केले. ३० ऑगस्टपर्यंत चुकारे खात्यात जमा न केल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी यावेळी दिला. प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगराध्यक्षा शालू दंडवते, जि. प. सभापती रोषनी पारधी, पं स च्या सभापती रेवता अलोने, शेवंता अवसरे, सदस्य अर्चना ढोरे, मोहन गायकवाड, सुनील पारधी, जि. प. सदस्य नाजूक पुराम, बबलू हुसैनी, रवी गोटेफोडे, चांगदेव फाये सहकारी खरेदी संस्थेचे अन्नाजी तुपट, क्षीरसागर नाकाडे, मुरलीधर सुंदरकर यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.