लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या कोरची येथील झंकारगोंदीजवळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. १) बेमुदत चक्काजामआंदोलन केले. या आंदोलनाला उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार सी. आर. भंडारी व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असल्याने रस्त्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी कृषी विभागाचे अधिकारी लाकेश कटरे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता मिथिन मुरकुटे, सहायक अभियंता प्रफुल कुरसंगे यांनीही भेट देऊन चर्चा केली. पण शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनस्थळी येऊन चार दिवसांत संपूर्ण मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकरी परिषदेचे हे बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले.कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रतिएकर ९.५० क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रतिएकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे. गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा धानखरेदीची मर्यादा १७ क्विंटल करण्यात यावी. तालुक्यातील बेतकाठी आणि बेळगाव या दोन केंद्रांवर रब्बी हंगामातील धान खरेदी केले जाणार असून या केंद्रांची खरेदी मर्यादा ३०३६ क्विंटल आहे. ही मर्यादा वाढवून ८ हजार क्विंटल प्रतिकेंद्र करण्यात यावी. खरीप हंगामातील धान खरेदीचे बोनस तत्काळ जमा करावे, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बेडगाव पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक नितीश पोटे, अनिल नानिकर यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाचे नेतृत्व नंदकिशोर वैरागडे, सुरेश काटेंगे, रामसुराम काटेंगे, अशोक गावतुरे, केशव लेनगुरे, आसाराम शेंडे, सियाराम हलामी, रंजित बागडेहरीया, भावराव मानकर, मेहरसिंग काटेंगे, सुनील सयाम, रुपेश गंगबोईर, रूपराम देवांगन, धनिराम हीळामी, सुखराम राऊत, महादेव बन्सोड, रामाधिन ताराम, तुलसीदास मडावी, शंकर जनबंधू यांनी केले.
अशा होत्या मागण्या- रब्बी हंगामात एकूण १७ क्विंटल धान खरेदी केंद्र करावे, बेतकाठी व बेळगाव या दोन गावांसाठी आठ हजार क्विंटलची धान खरेदीची परवानगी द्यावी, खरीप हंगामातील धानाचे बोनस तत्काळ देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे जोडणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरला त्यांची जोडणी तत्काळ करण्यात यावी, अशा विविध मुद्द्यांसह हे आंदोलन करण्यात आले.