निवडणूक रद्दची मागणी : जिल्हा न्यायालयात याचिका दाखल गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे व प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवक गुलाब मडावी व अनिता अविनाश विश्रोजवार यांची निवड रद्द करावी, यासाठी गडचिरोली जिल्हा न्यायालयात मंगळवारी याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेदरम्यान याचिकाकर्ते जयंत रंगाराव देशमुख यांनी दिली. निकाल घोषीत करतेवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या सह्या निकालपत्रावर घेणे आवश्यक आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सह्या घेतल्या नाहीत. माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली असता, काही ठिकाणी बनावट सह्या मारण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी स्कॅन करून सही करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील एकूण चार इव्हीएम मशीनपैकी केवळ तीनच मशीन दाखविण्यात आल्या. एक मशीन दाखविली नाही. प्रभाग क्रमांक १२ मध्ये सहा मशीन होत्या. त्यापैकी चार मशीन दाखविल्या. दोन मशीन दाखविल्या नाही. मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी प्रचारसभेदरम्यान मतदारांना प्रलोभन दाखवून आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणुकीच्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या. आदी मुद्यांना घेऊन जिल्हा न्यायालयात जयवंत देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे. नगर परिषदेकडे निकालासंदर्भात माहिती मागितली होती. मात्र केवळ प्रभाग क्रमांक ४ चीच माहिती दिली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. इतर प्रभागांची माहिती उपलब्ध होताच इतरही नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली. मुन्सीपल अॅक्ट १९६५ अन्वये याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांची बाजू अॅड. एस. एस. भट यांनी न्यायालयात मांडली. मंगळवारी सदर याचिका रजिस्टर्ड झाली, अशी माहिती देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक, नगरसेवक रमेश चौधरी, बाळू टेंभुर्णे, माधुरी भांडेकर, अपर्णा खेवले, शगुप्त बाशीद शेख, निशांत पापडकर, ओशना नागोसे, सुषमा राऊत आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान
By admin | Published: January 04, 2017 1:14 AM