केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे शेतकरीविराेधी आहेत. त्यामुळे हे कायदे रद्द करावे, शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा करण्यात यावा, नवीन वीजबिल विधेयक रद्द करण्यात यावे. पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ मागे घ्यावी, यासाठी आणि दिल्लीतील शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चामाेर्शी येथे काॅंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे केले. हे कायदे रद्द करण्यात यावे यासाठी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारशी अनेक वेळा चर्चा करूनही शेतकरीविरोधी कायदे रद्द केले नाहीत. उलट शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार दडपशाही मार्गाचा अवलंब करीत आहे.
पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना माेठा आर्थिक फटका बसत आहे. चामाेर्शी तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्याने खासगी व शासकीय बांधकामे ठप्प आहेत. त्यामुळे तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव करावे व अवैध रेती तस्करीवर आळा घालावा, आधारभूत धान खरेदी केंद्र मे महिन्यापर्यंत सुरू ठेवावे व शेतकऱ्यांचे धान खरेदी करावे अशी मागणी आंदाेलनादरम्यान करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार जितेंद्र शिकताेडे यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले. याप्रसंगी तालुका काॅंग्रेस अध्यक्ष विनाेद खाेबे, मार्गदर्शक आर.डी. राऊत, तालुका उपाध्यक्ष लीलाधर सूरजागडे, कालिदास पाल, जिल्हा काॅंग्रेस महासचिव रियाज शेख, कालिदास बुरांडे, तालुका महासचिव भास्कर चाैधरी, पंकज भिसे, संघटन सचिव विनाेद सालेकर, तालुका सचिव याेगेश लाडे, खुशाल चाैधरी, संजय हिचामी, गाेकुळ वासेकर, राजू धाेडरे, तालुका सदस्य गुरूदास सातपुते उपस्थित हाेते.