आरोग्याची काळजी घ्या : ज्येष्ठ नागरिक संस्थेचा उपक्रमचामोर्शी : ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संस्था चामोर्शीच्या वतीने सात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी गोविंद खामकर होते. प्रमुख अतिथी म्हणून एस. के. बावणे, पीएसआय कापुरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव माधमशेट्टीवार, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत दीक्षित, माजी सभापती किसनराव शेट्टे, गंगाधरराव गण्यारपवार, आर. डी. राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान सात ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शहीद रोशनकुमार डंबारे, पांडुरंग पिपरे, लक्ष्मण येनुगवार, जीवन पाल, नामदेव किरमे यांचे चालू वर्षात निधन झाले. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. म्हातारपणात अनेक रोगांना बळी पडावे लागते. त्यामुळे या कालावधीत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या केल्या पाहिजेत. बहुतांश वैद्यकीय तपासण्या सरकारी रुग्णालयांमध्ये करून मिळतात. त्यासाठी फारसा खर्च येत नाही, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष देवाजी बुरांडे तर आभार संस्थेचे सचिव सुरेश कागदेलवार यांनी मानले. या कार्यक्रमाला चामोर्शी तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक व संस्थेचे सदस्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
सात ज्येष्ठांचा चामोर्शीत सत्कार
By admin | Published: October 04, 2016 12:59 AM