योजना पोहोचवा : घरकूल, शौचालय, गैरव्यवहार, सिंचन विहिरी, रस्ते मुद्यांवर गदारोळचामोर्शी : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी घेण्यात आलेल्या चामोर्शी पंचायत समितीच्या आमसभेत घरकूल घोटाळा, शौचालय बांधकाम, विद्युत विभागाच्या कामात कंत्राटदारांनी केलेला गैरव्यवहार, ग्रामसेवकांचा गैरव्यवहार, रोहयोच्या अपूर्ण सिंचन विहिरी, स्मशानभूमी, ढोरफोडी, बसस्थानक, पांदन रस्ते आदी मुद्दे प्रचंड गाजले. दरम्यान सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी आमदारांपुढे प्रशासनाच्या दिरंगाईपणाचा पाढा वाचला. या सभेला प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती शशिबाई चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, नायब तहसीलदार बावणे, माजी पं.स. उपसभापती केशव भांडेकर, जि.प. सदस्य होमराज अलाम, कन्नाके, पं. स. सदस्य प्रमोद भगत, निमचंद भिवनकर, मनमोहन बंडावार, सोमनकर, रंजना कुमरे, दिवाकर यासलवार, रामेश्वर सेलुकर, दिलीप चलाख, स्वप्नील वरघंटे, माधव घरामी, नगरसेविका रोशनी वनघंटे, नगरसेवक प्रशांत एगलोपवार, यशवंत लाड आदी उपस्थित होते. तालुक्यातील ग्रामसेवकांच्या लेटलतीफ कारभाराचा मुद्दा उपस्थित करून संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी या आमसभेत केली. जि. प., पं. स. सदस्यांनी बसस्थानक, शौचालय, रस्ते, अतिक्रमण समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली. मागील व आताच्या पं. स.च्या आमसभेत गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांचे १५ दिवसांचे वेतन कपातीचा प्रस्ताव पाठविण्याचा ठराव या सभेत पारित करण्यात आला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचवाव्यात, असे निर्देश आमदार डॉ. होळी यांनी दिले. प्रास्ताविक बीडीओ मडावी, संचालन दीपक देवतळे तर आभार सुरेश कागदेलवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
चामोर्शी पं.स.ची आमसभा गाजली
By admin | Published: March 13, 2016 1:22 AM