अंकिसा माल येथे अवैध दारूविक्री बंद असूनही काही दारूविक्रेते चोरट्या मार्गाने गावात दारू विक्री करीत आहेत. दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच एका दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता किंगफिशर कंपनीच्या २ बिअर, आयबी व आरएस कंपनीच्या काही बाटल्या, अशी एकूण ३ हजार रुपयांची दारू पकडण्यात आली. याप्रकरणी असरअल्ली पोलीस ठाण्यात श्रीनिवास पोचम राल्लबंडी (४०) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई असरअल्लीचे पोलीस निरीक्षक पुरी यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, पोलीस कर्मचारी व मुक्तीपथ तालुका चमूने केली आहे.
जुनी वडसा येथे व्यसन उपचार शिबिर
देसाईगंज शहरातील जुनी वडसा वॉर्डात मुक्तिपथ अभियानातर्फे एक दिवसीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून एकूण १३ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला.
अरुण भोसले यांनी शिबिराला भेट दिलेल्या रुग्णांचे समुपदेशन केले. यावेळी शिबिर संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची माहिती घेतली. शिबिराचे नियोजन मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दारूबंदी संघटनेच्या अध्यक्षा सिंधू जोहरी, पुष्पाताई राऊत, चौधरी, नगरसेवक सचिन खरकाटे, समाधान खरकाटे, नगरसेविका कांबळी यांनी सहकार्य केले.