लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्रातर्गत येणाऱ्या अनंतपूर येथील सुभाष एकनाथ वासेकर या बेरोजगार युवकाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ४ लाख ६ हजार रूपये घेऊन फसवणूक केली आहे. याबाबतची घोट पोलीस मदत केंद्रात संबंधित युवकाने केली आहे. अनंतरपूर येथीलच गुरूदेव देवनाथ वासेकर व इतर तीन आरोपींनी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील डब्ल्यूसीएलमध्ये नोकरी लावून देण्याचे सुभाष एकनाथ वासेकर याला आमिष दाखविले. नोकरी लागेल या हेतूने सुभाषने २३ मार्च २०१३ रोजी ४ लाख ६ हजार रूपये दिले. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही नोकरी लागली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याची बाब सुभाषच्या लक्षात आली. यापूर्वी त्याने गुरूदेव वासेकरकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र पैसे देण्यास चारही आरोपी टाळाटाळ करीत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या सुभाषने याबाबतची तक्रार घोट पोलीस मदत केंद्रात १० जुलै रोजी दाखल केली. घोट पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील केवळ गुरूदेव देवनाथ वासेकर याच आरोपीला अटक झाली आहे. इतर तीन आरोपी गडचांदूर, नागपूर जिल्ह्यातील कामठी व नागपूर येथील आहेत. या आरोपींच शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 2:09 AM