आष्टी येथे वाहतुकीस अडथळा : गाव सीमेनुसार फेरर्सर्वेक्षण करून अतिक्रमण हटवावे आष्टी : आष्टी येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे घरांच्याही बांधकामात वाढ झालेली आहे. रस्त्याच्या सीमेवर अनेक लोकांनी पूर्वी घरे बांधली होती. परंतु आता येथील मुख्य चौकातही काही व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने चौकाला व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा विळखा आहे. परिणामी येथे वाहतुकीस अडथळा येत आहे. या समस्येबद्दल काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करून गाव सीमेनुसार पुनर्सर्वेक्षण करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली आहे. १९९१ ला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथील मुख्य रस्त्यापासून गावाची सीमा ठरविण्यात आली होती. परंतु बऱ्याच लोकांनी या आदेशाची पायमल्ली करून रस्त्यालगत घरे बांधली. तसेच येथील मुख्य चौकातही अनेक व्यावसायिकांनी खासगी दुकाने थाटली. त्यामुळे चौकातीलही रस्ते अरूंद झाले. त्यामुळे येथून आलापल्ली, गोंडपिंपरी, चामोर्शी मार्गे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा होत आहे. परिणामी येथे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन सामान्य नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. सध्या डॉ. आंबेडकर चौक पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात असून चारही बाजुंनी दिवसेंदिवस सदर अतिक्रमण वाढत आहे. परिणामी चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी करून लोकांना दुकानांमधील साहित्य खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. व्यावसायिक वस्तूही ठेवतात रस्त्यावर आष्टी येथील डॉ. आंबेडकर चौकातील व्यावसायिकांकडून वस्तू रस्त्यावर ठेवल्या जात असल्याने रस्ते आधीच अरूंद झाले आहेत. शिवाय पुन्हा येथे विविध वस्तू खरेदी करण्याकरिता येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यालगत राहत असल्याने पादचाऱ्यांना तसेच इतर वाहनधारकांना आवागमन करताना त्रास होत आहे. या समस्येसंदर्भात काही लोकांनी जिल्हाधिकारी तसेच चामोर्शी येथील तहसीलदारांकडे तक्रार करून अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु तक्रारीनंतर अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही. आष्टी येथील मुख्य चौकातील अतिक्रमण हटणे गरजेचे आहे. तेव्हाच येथील वाहतूक सुरळीत होऊ शकते. अन्यथा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
चौकाला व्यावसायिकांचा विळखा
By admin | Published: July 23, 2016 2:03 AM