गडचिरोली : सध्या नक्षलवांच्या टीसीओसी कालावधीत त्यांच्याकडून विविध घातपाती आणि हिंसक कारवाया घडविण्याचा प्रयत्न होताे. अशाच प्रयत्नात असलेल्या एका नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिस दलाने (दि.२३) रोजी अटक केली. वेल्ला केसे वेलादी (३५ वर्षे, रा.येडापल्ली जि.बिजापूर (छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दामरंचा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून वेलादी याला अटक केली. तो सन २००१ पासून जनमिलीशीया म्हणून नक्षलचे काम करत होता. सन २००६ पासून दिलीप आणि मंगी (सँड्रा) दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. सप्टेंबर २०२१ मध्ये मौजा मडवेली जंगल परिसरातील आणि अलीकडे टेकामेटा जंगलातील चकमकीत सहभाग होता. या चकमकीत त्याने छत्तीसगड दलमचा डीव्हीसीएम भास्कर यास पळून जाण्यास मदत केली होती. जाळपोळ, चकमक, दरोडा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. न्यायालयाने त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर दिला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.