राजनांदगाववरून शिष्टमंडळ दाखल : विविध कामांना दिल्या भेटीविसोरा : देसाईगंज तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या कसारी गावात शासनाच्या विविध योजनांची आदर्श पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. या गावाला महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे पुरस्कारही मिळाले आहेत. कसारीच्या या आदर्शत्वाची माहिती घेण्यासाठी छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्ह्यातील अंबागड चौकी तालुक्यातील तिरफेमटा, कसारपटली, मोहगाव येथील सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी कसारीला भेट दिली.गावातील सामुहिक वनहक्क कार्यक्रम, गावाच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, तंटामुक्ती तसेच अनेक अभिनव योजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. रोजगारासंदर्भात गावाने सुरू केलेल्या विविध योजना कशापद्वतीने राबविल्या जात आहे, याचीही माहिती छत्तीसगड राज्यातील सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने जाणली.यावेळी या शिष्टमंडळात महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कसारीच्या सरपंच तीर्था पुसाम व ग्राम पंचायत सदस्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना गावातील सर्व कामाची माहिती दिली. तसेच त्यांना प्रत्यक्ष स्थळावरही नेऊन कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. (वार्ताहर)
छत्तीसगडच्या सरपंचांनी जाणली कसारीच्या यशाची गाथा
By admin | Published: September 17, 2015 1:42 AM