शेतकऱ्याची तक्रार : कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनू योजनेत अजब प्रकारवैरागड : उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनू दत्तक योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना ज्वारी व मक्का या वाणाचे बियाणे १०० टक्के सुटीवर वितरीत केले जातात. मात्र वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत चपराशी ज्वारी व मक्का बियाणे देण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळतो, अशी तक्रार सुकाळा येथील शेतकरी वामन सोनटक्के यांनी आरमोरीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. आर. राठोड यांच्याकडे केली आहे. त्यामुळे जि. प. च्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनू दत्तक योजनेला गालबोट लागले आहे. कामधेनू दत्तक योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यातील मेंढेबोडी, सुकाळा या गावासाठी वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कृषी व पशुविभागाकडून शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर वितरीत करण्यासाठी मक्का व ज्वारीचे बियाणे पुरविण्यात आले. सुकाळा व मेंढेबोडी परिसरात धानाची कापणी आटोपली असल्यामुळे अनेक शेतकरी ज्वारी व मक्का पिकांच्या पेरणीकडे वळले आहेत. कामधेनू दत्तक योजनेंतर्गत जि. प. च्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत १०० टक्के सवलतीवर शेतकऱ्यांना ज्वारी व मक्का पिकाचे बियाणे पुरवा, असा आदेश आहे. दरम्यान सुकाळा व मेंढेबोडी या परिसरातील अनेक शेतकरी वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मक्का व ज्वारीचे बियाणे घेण्यासाठी गेले असता, तेथील कार्यरत चपराशी खोब्रागडे हे अनेक शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार दिसून आला.चपराशी खोब्रागडे यांनी शेतकरी वामन सोनटक्के यांच्याकडून ५ किलो ग्रॅमच्या पाच बॅगासाठी प्रत्येकी बॅग २० रूपये याप्रमाणे १०० रूपये वसूल केले, अशी तक्रार शेतकरी सोनटक्के यांनी पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. पैसे देण्यापूर्वी शेतकरी सोनटक्के यांनी पैसे उकळण्याबाबत चपराशी खोब्रागडे यांना जाब विचारला असता, वाहतुकीचा खर्च म्हणून प्रती बॅग २० रूपये घ्यावे लागतात, असे रोखठोक चपराशी खोब्रागडे यांनी शेतकरी सोनटक्के यांना सांगितले. चपराशी खोब्रागडे यांच्याकडून सुरू असलेल्या या प्रकरणाची जि. प. च्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी सोनटक्के यांनी केली आहे. (वार्ताहर)
सुटीच्या बियाण्यांवर चपराशी उकळतो पैसे
By admin | Published: November 12, 2014 10:43 PM