दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नाली स्वच्छतेच्या कामात पारदर्शकता राहावी, शिवाय शहरातील सर्व वार्डातील नाली सफाई नियमित व पुरेशा प्रमाणात व्हावी या हेतुने पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी गेल्या महिनाभरापासून कडक धोरण अवलंबिले आहे. नाली सफाईचे काम मजुरांकरवी करवून घेणाºया कंत्राटदाराकडून अनेक मजूर गैरहजर राहत असल्यामुळे नाली स्वच्छतेच्या कामावर परिणाम होत असल्याचे आढळून आल्याने मुख्याधिकारी निपाने यांनी संबंधित कंत्राटदाराच्या चार महिन्याच्या बिलातून जवळपास १० लाख रूपये कपात केले आहे. सदर दंडात्मक कारवाई करून मुख्याधिकाºयांनी संबंधित कंत्राटदाराला चांगलाच दणका दिला आहे.स्थानिक नगर पालिकेच्या वतीने नागपूर येथील साई सुशिक्षीत बेरोजगार संस्थेला जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीचे शहरातील नाली सफाईच्या कामाचे कंत्राट देण्यात आले. नाली स्वच्छतेच्या कामाचे सहा झोन पाडण्यात आले आहे. प्रत्येक झोनच्या कामाची जबाबदारी उपकंत्राटदारांकडे सोपविण्यात आली आहे. मात्र जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत संबंधित कंत्राटदाराच्या नाली स्वच्छतेच्या कामावर निर्धारीत केलेली मजूर संख्या उपस्थित दिसून आली नव्हती. याबाबत मुख्याधिकाºयांसह काही नगरसेवकांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी नाली स्वच्छतेच्या कामावर मजुरांची उपस्थिती कमी आढळून आली. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी निपाने यांनी संबंधित कंत्राटदाराच्या बिलातून रक्कम कपात करण्याचा निर्णय घेतला. शहरातील नाली स्वच्छतेच्या कामावर दररोज १०८ मजूर उपस्थित असणे आवश्यक असल्याचे निविदा प्रक्रियेत नमूद करण्यात आले होते. तसेच संबंधित कंत्राटदाराला याबाबत मौखिक सूचनाही देण्यात आल्या. मात्र या सुचनेकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने मजुरांची अनुपस्थिती दिवसेंदिवस वाढतच राहिली. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी ठोस निर्णय घेऊन संबंधित कंत्राटदाराच्या चार महिन्याच्या बिलातून जवळपास दहा लाख रूपये कपात केले आहे. नाली स्वच्छतेच्या कामावरील मजुराला प्रती दिवस ३७५ रूपये मजुरी कंत्राटदाराकडून दिली जाते. यामध्ये ५० रूपये पीएफ कापून मजुराच्या हातात ३२५ रूपये दिले जातात. रक्कम कपातीच्या कारवाईने कंत्राटदाराला चाप बसला आहे.प्रती मजूर ५०० रूपये प्रमाणे रक्कम कपातनागपूर येथील संस्थेला जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षाचे शहरातील नाली स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट एकूण १ कोटी ४८ लाख रूपये देण्यात आले आहे. एवढ्या रकमेत १२ प्रभागातील २३ वार्डातील सर्व नाल्यांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. संबंधित कंत्राटदाराचे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या बिलातून जवळपास १० लाख रूपयांची न.प. प्रशासनाने कपात केली व त्यानंतर १० दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदाराला ३२ लाख रूपयांचे बिल अदा करण्यात आले. एका दिवशी गैरहजर राहिलेल्या प्रती मजूर ५०० रूपये दंडानुसार १० लाख रूपयांची रक्कम बिलातून कपात केली.कारवाईने कामावरील मजूर उपस्थिती १०० वर पोहोचलीनाली स्वच्छतेच्या कामावर असलेल्या ७० ते ८० मजुरांची मजुरीची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. त्यामुळे आठ ते दहा दिवसापूर्वी नाली सफाई कामगारांनी एक दिवसाचा संप पुकारून कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी नाली स्वच्छतेचे काम ठप्प झाले होते. हे काम प्रभावित होऊ नये, यासाठी न.प. प्रशासनाने लगबगीने कार्यवाही करून मजूर अनुपस्थितीची रक्कम कपात करून उर्वरित बिल संबंधित कंत्राटदाराला अदा केले. त्यानंतर कंत्राटदाराने प्रलंबित मजुरी कामगारांना दिली. दंडात्मक रक्कम बिलातून कपात केल्याच्या कारवाईने कंत्राटदाराच्या कामात सुधारणा झाली. आता १०० वर मजूर नाली स्वच्छतेच्या कामावर हजर राहत आहेत.
स्वच्छता कंत्राटदाराला मुख्याधिकाऱ्यांचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:40 AM
नाली स्वच्छतेच्या कामात पारदर्शकता राहावी, शिवाय शहरातील सर्व वार्डातील नाली सफाई नियमित व पुरेशा प्रमाणात व्हावी या हेतुने पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी गेल्या महिनाभरापासून कडक धोरण अवलंबिले आहे.
ठळक मुद्देमजूर अनुपस्थितीचे कारण : बिलातून १० लाख रूपये कपात