गडचिरोली- मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचपार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे कुठेही मदत कमी पडणार नाही. या बद्दलच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मालमत्ता आणि जीवितहानी होणार नाही. तसेच गडचिरोलीतील काही नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. राज्यातील इतर भागातही अतिवृष्टीबाबत विशेष सूचना दिल्या असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर काही काळ थांबून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणीपातळी आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
दरम्यान, हवामान विभागाने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात ११ ते १२ जुलैदरम्यान रेड अलर्ट जाहीर केला आहे. हा अंदाज खरा ठरत रात्रीपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस काेसळत हाेता. अगाेदरच ओसंडून वाहणाऱ्या नदीनाल्यांच्या पातळीत पुन्हा वाढ झाली.
संजय सराेवर, गाेसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. गाेदावरी, प्राणहिता व वर्धा नदीसुद्धा उफाळून वाहत आहे. माेठ्या नद्या उफाळून वाहत असल्याने या नद्यांना लागून असलेल्या लहान नद्या व नाल्यांना दाब निर्माण झाला आहे. परिणामी, काही ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे.