आष्टी : चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली, चपराळा येथे मंगळवारी दुपारी २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी पावसाने २० लोकांच्या घराचे कवेलू, सिमेंट पत्रे उडाली. घरात पाणीही शिरल्याने बरेच नुकसान झाले.
या पावसात चौडमपल्ली ते चपराळा मार्गावरील १०० पेक्षा जास्त झाडांच्या फांद्या तुटल्या आणि काही झाले कोसळली. आठ विद्युत खांब पडल्याने मंगळवार व बुधवार असे दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोविड-१९च्या लॉकडाऊनच्या काळात आणि शेतीच्या हंगामात आलेल्या या संकटाने शेतकरी हादरून गेले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी पोलीसपाटील देवकुमार मेश्राम, सरपंच निखिल मडावी व गावकऱ्यांनी केली आहे. तलाठी महिंदरे, ग्रामसेवक उत्तम बारसागडे यांनी पंचनामे केले.
(बॉक्स)
जिल्हा परिषद सदस्याची भेट
चौडमपल्ली येथील माणिक मेश्राम, अर्जुन कन्नाके, रमेश नैताम, चपराळा येथील मनोहर आदे, प्रभाकर आत्राम, दयानंद कोकेरवार, पोचू कोकेरवार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आष्टी- इल्लूर जि. प. क्षेत्राच्या सदस्य रुपाली पंदिलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी तलाठी व ग्रामसेवक यांना माहिती देऊन मोका पंचनामा करण्यास सांगून शासनाकडून तत्काळ आर्थिक नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.