दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील जवळपास ४०० ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालविले जाते. खासगी केंद्रांप्रमाणेच या केंद्रांमध्येही नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणापत्र काढून देण्याची सुविधा आहे. मात्र या केंद्रातील चालकही नागरिकांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. खासगी केंद्रचालकांबराेबरच ग्रामपंचायतमध्येही विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील केंद्रचालकाला ग्रामपंचायतीमार्फत स्वतंत्र खाेली, वीज व इतर सुविधा पुरविल्या जातात. तसेच त्याला शासनामार्फत मानधनही दिले जाते. गावातील एखादा व्यक्ती जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व इतर दस्तावेज काढण्यासाठी आला तर शासकीय दराप्रमाणेच शुल्काची आकारणी करणे आवश्यक आहे. मात्र संगणक ऑपरेटर संबंधित नागरिकाकडून १०० ते २०० रुपये वसूल करतात. ग्रामीण भागातील नागरिक शासकीय दराबाबत अनभिज्ञ राहतात. याचा गैरफायदा संगणक ऑपरेटरकडून घेतला जात आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांना तालुकास्थळी जावे लागू नये, गावातच साेय व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र तेसुद्धा लूट करीत आहेत.
सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष द्यावेसंगणकचालक हा ग्रामपंचायतमध्येच बसतो. त्याच्या सर्व कार्यावर ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष असायला पाहिजे. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी किती रुपये आकारले जातील याचा दरफलक ग्रामपंचायतीसमाेर लावायला पाहिजे, तशी सक्ती सरपंचांनी संगणकचालकाला करावी. मात्र सरपंच व ग्रामपंचायत सदस्य शासकीय दराबाबत अनभिज्ञ असल्याने संगणक ऑपरेट आपल्या मनमर्जीने दर आकारून नागरिकांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.
खाेली, वीज ग्रामपंचायतीची, चालकाला मानधनही मिळतेग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या आपले सरकार केंद्र चालकाला ग्रामपंचायतीत खाेली उपलब्ध करून दिली जाते. वीजही ग्रामपंचायतीची वापरली जाते. तसेच संगणकचालकाला शासनामार्फत मानधनही दिले जाते. त्यामुळे ५८ रुपयांना प्रमाणपत्र काढून देणे परवडत नाही, हा मुद्दाच शिल्लक राहत नाही. जाे शासकीय दर आहे, तेवढेच दर आकारणे आवश्यक आहे.