आलापल्लीच्या ग्रामसभेत चर्चा : २४५ रूपये तेंदू संकलनाची दिली मजुरीलोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : तेंदूपत्ता संकलन करण्याचा दर २५७ रूपये प्रती शेकडा असतानाही आलापल्ली येथील मजुरांना केवळ २४५ रूपये मजुरी देण्यात आली आहे. याबाबत नागरिकांनी आलापल्लीच्या ग्रामसभेत तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासकीय नियमाप्रमाणे आपल्याला मजुरी देण्यात यावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष घुटे यांच्या अध्यक्षतेखाली आलापल्लीची ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, उपसरपंच पुष्पा अलोणे, प्रभारी सचिव गंजीवार, उपस्थित होते. ग्रामसभेला आलापल्लीच्या सरपंच रेणुका कुळमेथे यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्य सुध्दा अनुपस्थितीत होते. नागरिकांनी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत रोष व्यक्त केला. आलापल्ली ग्रामपंचायतीत तेंदूपत्ता लिलावात घोळ झाला होता. याबाबतच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त तेंदूपत्ता व रॉयल्टीचा हिशोब केला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बाजारवाडी व गुजरी लिलावातील ४ लाख २५ हजार रूपयांचा हिशोब दिला नाही. ग्रा.पं.च्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात यावे, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्यांचे आजीवन सदस्यत्व रद्द करून फेरलिलाव करण्याचा ठराव पारित झाला. १४ व्या वित्त आयोगाच्या ८५ लाख रूपये निधीचे नियोजन करण्यात आले. वॉटर एटीएम लावणे, सहा घंटागाड्या विकत घेणे, नाली बांधकाम, अंगणवाडी दुरूस्ती करणे, स्टिट लाईट लावणे, तलावाचे सौंदर्यीकरण करणे आदी ठराव घेण्यात आले.
कमी मजुरीबाबत नागरिक संतप्त
By admin | Published: June 12, 2017 12:57 AM