काेरची : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काेरची तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात दाेन दिवस दाैरा केला. या दाैऱ्यात त्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीमधील कामकाजाचे निरीक्षण केले. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असता, अनेक गावातील नागरिकांनी त्यांच्यासमाेर मूलभूत समस्यांचा भडीमार केला. काेरची तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात सीईओ आशीर्वाद यांनी दाैरा केला. ३१ डिसेंबरला जांभळी येथे भेट दिली. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी अनेक समस्या मांडल्या. यामध्ये माेबाईल कव्हरेज व इंटरनेटचा अभाव, अनियमित वीज पुरवठा, कृषिविषयक अडचणी, गावांमध्ये वाढीव खांबांचा अभाव, आराेग्य विभागातर्फे शिबिर घेऊन तपासणी करणे आदींचा समावेश हाेता. दरम्यान, सीईओंनी गावातील विहिरी, नाल्या, अंगणवाडी, तलाव आदींना भेट देऊन पाहणी केली व समस्या साेडविणे तसेच याेग्य उपाययाेजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी गटविकास अधिकारी देवीदास देवरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.
बाॅक्स...
मूलभूत समस्या साेडविण्याचे निर्देश
भेटीदरम्यान सीईओ आशीर्वाद यांना अनेक समस्या आढळून आल्या. या समस्या साेडविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यामध्ये अंगणवाडी दुरुस्ती करून साहित्य खरेदी करणे, जि.प. शाळेत शाेषखड्डे तयार करणे, नाल्यातील गाळाचा उपसा करणे, सार्वजनिक विहिरींची दुरुस्ती, जांभळीच्या मामा तलावातील गाळ काढणे, नरेगातून गुरांचे गाेठे बांधणे, विहीर दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करणे आदींचा समावेश हाेता.