ऑनलाइन लोकमतगडचिरोली, दि. 3 - अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची पोलीस कशा पद्धतीने सुटका करतात, कोणत्या तंत्राचा अवलंब करतात, याविषयीचा डेमो गडचिरोली पोलिसांनी सादर केला. अपहरण झालेल्या बस सुटकेचा थरार यानिमित्ताने शहरवासीयांनी अनुभवला. 'पोलीस रेजिंग डे' निमित्त पोलिसांच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात डेमोचे आयोजन केले होते. ह्यपोलीस रेजिंग डेह्ण निमित्त गडचिरोली पोलिसांच्या वतीने जिल्हाभरात २ जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम ८ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते, हे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक रहस्य आहे. याबाबींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, या उद्देशाने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात मंगळवारी सकाळी ११ वाजता अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पोलिसांच्या वतीने कोणत्या तंत्राचा वापर केला जातो, बसला कशाप्रकारे थांबविले जाते, याचे प्रात्यक्षिक सादर केले.
सदर प्रात्यक्षिक बघून नागरिक आश्चर्यचकित झाले. नक्षल्यांकडून बसचे अपहरण करण्यात आले आहे. सदर बस आरमोरीवरून निघाल्याचे पोलिसांना माहित होते. त्यानुसार पोलीस इंदिरा गांधी चौकात या बसला अडविण्यासाठी सापळा रचतात. अपहरणकर्ता सहजासहजी बस थांबविणार नाही, ही बाब पोलिसांना पक्की माहित असल्याने अपहृत बसच्या अगदी समोर पोलिसांचे वाहन उभे केले जाते. त्यामुळे अपहृत बसचाचालक बस थांबवितो. त्याचवेळी लपून बसलेले सशस्त्र पोलीस जवान तत्काळ बसच्या दिशेने आगेकूच करतात व बसला घेराव घालतात. दोन ते तीन जवान तत्काळ बसमध्ये चढून प्रवाशांची सुटका करतात. तर अपहरणकर्त्यांनाही ताब्यात घेतले जाते. अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची काय स्थिती असते, याचा थरार गडचिरोलीवासीयांनी अनुभवला. हा थरार बघून काहीकाळ नागरिकांच्या हृदयाचे ठोके चुकले.जवळपास १५ ते २० मिनीट चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे चारही मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर सदर प्रात्यक्षिक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, ठाणेदार विजय पुराणिक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)