अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात क व्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांचा संपर्क आहे.
शाळा आवारात जनावरांचा वावर
आलापल्ली : अहेरी पंचायत समितीअंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षण भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारण्यात आले नाही. परिणामी गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालित आहेत.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचºयावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कृषी विभागावरचा रिक्त पदांचा भार वाढला
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के जनता शेती व शेतीवर आधारित उद्योगावर आपली उपजीविका करीत आहे. मात्र याही विभागात जवळपास २० टक्के पदे रिक्त आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पदे रिक्त असल्याने या कार्यालयात प्रशासकीय कामकाजाची गती मंदावली आहे.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरूस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटºया चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत.
कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाज बांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक वर्षांपासून येथे आवश्यक प्रमाणात सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाहीत.
एकोडी- वेलतूर मार्गावर काटेरी झुडुपे कायमच
चामोर्शी : तालुक्यातील एकोडी- वेलतूर तुकूम मार्गावरील दुतर्फा काटेरी झुडुपांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याने या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे सदर झुडूपे तोडण्याची गरज आहे. फांद्या रस्त्यावर येत असल्याने विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसण्यास अडथळा होत आहे.
हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भूयार जात असून तो भूयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघतो, अशी आख्यायिका आहे.
येवली येथे जलद बसथांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बस थांबा आहे. मात्र गडचिरोली आगाराच्या बसगाड्या व्यतिरिक्त इतर आगाराच्या जलद बसगाडया येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलवावी लागत आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका
भामरागड : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगर पंचायतीकडे केली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कुत्र्यांची संख्या वाढत आहे.