लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी भीती अजून कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला प्राधान्य देत लोक त्यासाठी पुढे येत आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात याबाबत फारसा उत्साह नसला तरी शेजारच्या तेलंगणा राज्यातील लोक गडचिरोली जिल्ह्यात येऊन लसीकरण करून घेत आहेत.
जिल्ह्याच्या दक्षिणेस असलेला सिरोंचा तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. गोदावरी नदी पार केली की पलीकडे तेलंगणातील भूपालपल्ली, मंचेरियाल जिल्हे लागतात. त्या भागातील काही लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने तेथील नागरिक सिरोंचा येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
सिरोंचातील लसीकरण केंद्रावर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने लसीकरण सुरू आहे. त्यामुळे येणारी व्यक्ती दुसऱ्या राज्यातून येत आहे, असा भेदभाव न करता लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे.
कोणालाही कुठेही लस घेण्याची मुभा
ऑनलाइन पद्धत असल्याने आणि भारत सरकारच्या निर्देशानुसार कोणतीही व्यक्ती कुठेही लस घेऊ शकत असल्याने तेलंगणाचे लोक सिरोंचात येऊन लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे सिरोंचातील नागरिक तेलगू चांगल्या प्रकारे बोलतात. त्यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांना एकमेकांबद्दल वेगळेपण जाणवत नाही.