अहेरी : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. आता हिवाळा सुरू असला तरी दिवसामागे वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वीज सुरळीत करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
कुरखेडा : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.
कोंडवाड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
आरमाेरी : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र निधीअभावी कोंडवाड्याची दुरावस्था झाल्याने जनावरांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. कोंडवाड्याची दुरुस्ती करणे अडचणीचे होत आहे.
रस्त्यावर कचरा टाकण्यास आळा घाला
गडचिराेली : शहरातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाॅर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होवू शकतात. त्यामुळे नगर परिषदेने स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने वाॅर्डात पाठवावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शिंगाडा उत्पादनासाठी हवे अर्थसहाय्य
कुरखेडा : जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात. परंतु, या व्यवसायाकरिता पैशाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थांकडून हाेत आहे.