वाघ व वाघीण कॅमेरात ट्रॅप : शार्प शुटरचे पथक परत गेले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज या तीन तालुक्यांच्या जंगल परिसरात वाघ व वाघीणीचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या परिसरात आणखी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच वाघाच्या शोधात आलेले शार्प शुटरही परत गेले आहेत. आरमोरी तालुक्यातील रवी येथील शेतकऱ्याचा बळी वाघाने घेतल्यानंतर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली होती. त्यानंतर वन विभागाने वाघाला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यासाठी २७ व २८ मे रोजी दोन दिवसांसाठी शार्प शुटर पाठविले होते. मात्र या शार्प शुटरला वाघ मिळाला नाही. मुदत संपल्याने शार्प शुटर परत गेले. आणखी ३ ते १५ जूनपर्यंत शार्प शुटरचे पथक आले होते. मात्र याही कालावधीत वाघाला जेरबंद करणे शक्य झाले नाही. वन विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. या कॅमेरांमध्ये वाघ व वाघीणीचे छायाचित्र दिसून आले आहेत. रवी परिसरात लावलेल्या कॅमेरांमध्ये जास्तीत जास्त वेळा वाघीण नजरेस पडली असल्याने या परिसरात वाघीणीचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पोर्ला परिसरात वाघाचे दर्शन झाले आहे. वाघ व वाघीण आढळून आल्याने नागरिकांमध्ये आणखी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघीण गरोदर राहिल्यास आणखी वाघ व वाघीणीचे वास्तव्य लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शार्प शुटरच्या पथकाने १५ दिवस रवी परिसरातील संपूर्ण जंगल पिंजून काढले. मात्र नरभक्षक वाघ शार्प शुटरला आढळून आला नाही. वाघाचा शोध घेण्याचे काम सुरूच असताना ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथील घटना घडली. त्यामुळे शार्प शुटरचे पथक त्या ठिकाणी गेले आहे. त्यांना पुन्हा परत बोलविले जाईल. - पी. आर. तांबटकर, वन परिक्षेत्राधिकारी, आरमोरी
दोन वाघांच्या वास्तव्याने नागरिक आणखी धास्तावले
By admin | Published: June 17, 2017 1:53 AM